गुरुदेवभक्तमय झाली गुरुकुंजनगरी.! लाखो गुरुदेवभक्तांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली

  • गुरुकुंजला पंढरीचे स्वरूप..
  • परदेशी पाहुण्यांनी अनुभवला नयनरम्य सोहळा..
  • केवळ 2 मिनिटांसाठी गुरुकुंजनगरी झाली स्तब्ध..

गेल्या दोन वर्षांच्या कोरोना काळाच्या सावटानंतर आज पुन्हा एकदा मानवतेचे महान पुजारी,गुरुमाऊली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 54 वा पुण्यतिथी सोहळा पावनभूमी गुरुकुंज आश्रम मोझरी येथे शिस्तबद्धरित्या पार पडला.ठीक 4 वाजून 58 मिनिटांनी केवळ 2 मिनिटांसाठी ही गुरुकुंजनगरी अक्षरशः स्तब्ध झाली होती.गुरूभूमीत उपस्थित लाखो गुरुदेवभक्तांनी यावेळी महाराजांना आहे तेथेच उभे राहून मौन श्रद्धांजली अर्पण केली.याप्रसंगी प्रथमच मोठ्या संख्येने परदेशी पाहुणे उपस्थित होते.

अश्विन वद्य पंचमी 11 ऑक्टोबर 1968 ला दुपारी ठीक 4 वाजून 58 मिनिटांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे देहावसान झाले होते.तेव्हापासून आजपर्यंत अविरतपणे गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंताचा पुण्यतिथी महोत्सव त्यांचे अनुयायी लाखोंच्या संख्येने एकत्रित येत साजरा करतात. 14 ऑक्टोबर रोजी सुद्धा दरवर्षी प्रमाणे साजरा होणारा पुण्यतिथी महोत्सवातील मौन श्रद्धांजली सोहळा अतिशय शिस्तबद्ध रित्या संपन्न झाला. या सर्वोत्कृष्ट महत्वाच्या कार्यक्रमाची सुरुवात ठीक 3 वाजून 30 मिनिटांनी “गुरुदेव हमारा प्यारा.. है जीवन का उजियारा” ..या गीताने झाली.यावेळी प्रथमच मोठमोठ्या देशातून परदेशी पाहुणे गुरुकुंजाच्या धर्तीवर उपस्थित झाले होते.त्यांनी देखील महाराजांचा हा सोहळा अनुभवला.

गेली 2 वर्ष कोरोनाच्या सावटामुळे गुरुमाऊली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधी दर्शनासाठी तसेच श्रद्धांजली सोहळ्याला गुरुदेवभक्तांना मोजक्याच संख्येत उपस्थित राहता आले होते. मात्र यावर्षी कोरोनाचे सावट नसल्याने महाराष्टाच्या कानाकोपऱ्यातून स्वतः च्या कामाचे नियोजन करून,मिळेल त्या वाहनाने,आपल्या लाडक्या राष्ट्रसंताना अभिवादन करण्यासाठी गुरुदेवभक्त उपस्थित झालें होती.जसजशी महाराजांची श्रद्धांजलीची वेळ जवळ येत होती,तशतशी गुरुदेव भक्तांचे जथ्थे चे जथ्थे गुरुकुंजात पोहचले अन वेळेपर्यंत येथील भूमी लाखोच्या संख्येत गुरुदेवभक्तमय झाली होती.

यावर्षी राष्ट्रसंताच्या पुण्यतिथी सोहळ्याला गुरुदेव भक्तांची संख्या जादा राहणार असल्याने आयोजक अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाच्या वतीने येथील भव्य प्रांगणातील पुण्यतिथी मंडप हा भव्य स्वरूपात उभारूनही येथे लाखो गुरुदेव भक्तांना जागा अपुरी पडली होती.एवढ्या मोठ्या संख्येत गुरुदेवभक्त येथे उपस्थित होते.

राष्ट्रसंताच्या या श्रद्धांजली सोहळ्याला माजी पालकमंत्री तथा आमदार यशोमती ठाकूर, खासदार नवनीत राणा, ऍड सचिन देव महाराज, पुष्पाताई बोंडे, अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश वाघ, सरचिटणीस जनार्दनपंत बोथे, दामोदर पाटील, लक्ष्मण काळे महाराज, जिल्हा परिषद सदस्य गौरी संजय देशमुख, आमदार दादाराव केचे, आमदार सुलभा खोडके, राजेश वानखडे, निवेदिता दिघडे, आदी सर्व राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *