आषाढी एकादशीला हिंदु बांधवांच्या भावनांचा आदर करुन कुर्बानी न देण्याचा मुस्लिम समाजाचा निर्णय

मुस्लिम धर्मियांचा बकरीईद सण व हिंदु धर्मियांची आषाढी एकादशी हे दोन्ही सण एकाच दिवशी येत असुन मुस्लिम बांधवांनी हिंदु बांधवांच्या भावनांचा सन्मान करत बकरीईदच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा ऐतिहासीक निर्णय घेतला आहे. बेलापुर येथे नुकतीच शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली. त्यात सर्व मुस्लीम बांधवांनी हा निर्णय घेतल्याचे जाहीर केले असुन त्यांच्या निर्णयाचे हिंदु बांधवांनी तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे.

बेलापुर येथे नुकतीच शांतता कमिटीची बैठक श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. मुस्लीम बांधवाचा सण बकरीईद तसेच हिंदू बांधवांचा पवित्र आषाढी एकादशी हे दोन्ही सण एकाच दिवशी येत असुन त्या दिवशी काही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने शांतता कमीटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. पोलीस प्रशासनाच्या वतीने काही सुचना करण्याच्या आगोदरच मुस्लीम बांधवांनी जाहीरपणे सांगितले की, आम्ही सर्व आषाढी एकादशी हा हिंदु बांधवांचा मोठा व पवित्र सण असल्याने या दिवशी सर्व हिंदु बांधव पुजाअर्चा करुन उपवास करतात. याच दिवशी मुस्लीम बांधवांचा कुर्बानी देण्याचा सण बकरीईद येत आहे. त्यामुळे हिंदु बांधवांच्या भावनांचा आदर करुन दोन दिवस कुर्बानी न देण्याचा निर्णय आम्ही सर्व मुस्लीम बांधवांनी सर्वानुमते घेतला आहे. ईस्माईल शेख, मोहसीन सय्यद, बाबुलाल शेख, अयाजअली सय्यद, जाकीर शेख, अजीज शेख यांनी सांगितले. मुस्लीम बांधवांनी हा ऐतिहासीक निर्णय घेतला असुन या निर्णयांचे हिंदु बांधवाच्या तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *