फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्याचा छत्री तलावात बुडून मृत्यू; मित्रांसोबत गेला होता फिरायला

Amravati | येथील शासकीय फार्मसी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा छत्री तलावात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. चार) दुपारी उघडकीस आली. सुयोग अरुणराव दुधाणे (वय १९ रा. कारला, ता. अंजनगाव सुर्जी, ह. मु. विलास कॉलनी, कठोरा नाका) असे मृताचे नाव आहे.

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कारला येथील सुयोग हा कठोरा नाका येथील शासकीय फार्मसी महाविद्यालयात प्रथम वर्षाला शिकत होता. सोमवारी सुयोग कॉलेजमधील काही तरुणांसह छत्रीतलाव येथे फिरायला गेला होता. छत्री तलावाजवळ गेल्यावर सुयोग आणि त्याच्या दोन मित्रांना पोहण्याचा मोह झाला. त्यामुळे तिघेही पोहण्यासाठी पाण्यात उतरले. सुयोगला पोहणे असल्यामुळे तो खोलवर पोहत गेला. परंतु त्याला खोलीचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्यातून वर आला नाही. बराच वेळ झाला तरी तो पाण्यातून वर न आल्याने सोबत पोहणारे मित्र घाबरले आणि पाण्यातून बाहेर आले. त्यांनी बराच वेळ सुयोगला आवाज दिला. परंतु प्रतिसाद न मिळाल्यामुळे मित्र घाबरले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले आणि सुयोगचा शोध सुरु केला. परंतु सायंकाळ झाली तरी सुयोगचा पत्ता लागला नाही. पोलिसांनी पोहण्यात तरबेज व्यक्तींना बोलावून त्याचा शोध घेत असताना सायंकाळी ६ च्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानाला सुयोगचा मृतदेह आढळला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा व आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *