सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? नंदीबैलाला प्रश्‍न विचारण्याचा मोह

यंदा पावसाने गुंगारा देऊन तथाकथित हवामानतज्ज्ञांचे अंदाज फोल ठरविले. काल-परवापर्यंत कौतुकाचा वर्षाव झेलणाऱ्या या तज्ज्ञांना यंदा लोकांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ आली. विहिरींनी तळ गाठले अन् खरीप हातचे गेले. दुष्काळाची चाहूल लागत असताना नंदीबैल गावात आला असता भल्याभल्याना सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? असा प्रश्‍न विचारण्याचा मोह आवरेनासा झाला. त्यानेही कुणाला नाराज केले नाही.
यंदा तज्ज्ञांचेच अंदाज चुकल्याने नंदीबैलाची जबाबदारी आपसूक कमी झाली. पावसाच्या अंदाजाबरोबर आपल्या धन्याच्या पोटावर तोल सावरत सहजपणे उभे रहाण्याचा परंपरागत खेळ करून हे नंदीबैल ग्रामस्थांची मने जिंकत आहेत. कोणे एकेकाळी नंदीबैल मान हलवील त्यानुसार नंदिवाला पावसाचा अंदाज व्यक्त करायचा. डिजिटल क्रांती झाल्यावर हातातल्या मोबाईलवर देशी-विदेशी कंपन्यांचे अॅप पावसाचा दैनंदिन आणि तासनिहाय अंदाज देऊ लागले. ते बऱ्यापैकी खरे ठरत असल्याने अल्पावधीतच लोकप्रिय देखील झाले.
यंदा मात्र या तज्ज्ञांची पावसाने चांगलीच गोची केली. हवामान तज्ञाचे अंदाज सपशेल चुकल्याने लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. पावसाच्या अंदाजाचा आणि नंदीबैलाच्या मान हलविण्याचा काहीही संबंध नाही, हे ठावूक असूनही पावसाच्या ओढीपायी भलीभली मंडळी त्याला पाहून नंदीबैल, नंदीबैल पाऊस पडेल का असा प्रश्न विचारीत आहेत आणि नंदीबैलही तेवढ्यात उत्साहाने मान हलवून पाऊस पडेल, असा दिलासा देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *