अरुणाचल प्रदेशच्या इटानगरमध्ये भीषण आग; ७०० हून अधिक दुकानांचा कोळसा

इटानगर: अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरच्या नाहरलगुनमध्ये भीषण आग लागली. या आगीचं कारण स्पष्ट होऊ शकलं नाही. मात्र, या दुर्घटनेत ७०० हून अधिक दुकानं जळून खाक झाली.

या भीषण आगीच्या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी वा कुणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर दोन तासांत दोन दुकाने जळाली होती. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान पोहोचले. त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले नाही.

अरुणाचल प्रदेशातील ही सर्वात जुनी बाजारपेठ राजधानी इटानगरपासून जवळपास १४ किलोमीटरवर आहे. नाहरलगुनमध्ये पोलीस ठाणे आणि अग्निशमन केंद्रही घटनास्थळापासून जवळच आहे. तीन अग्निशमन बंबांद्वारे आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले गेले. आगीत किती नुकसान झाले आहे, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. अंदाजानुसार, या आगीत कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाहरलगुन डेली मार्केटमध्ये मंगळवारी सकाळी ही आग लागली. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग पहाटे चारच्या सुमारास लागली. आतापर्यंत या आगीत कोणतीही जिवीतहानी आणि कुणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

फटाके किंवा पेटलेल्या दिव्यांमुळे ही आग लागल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. मात्र, ही दुकाने लाकडांपासून तयार केल्याने ही आग वेगाने पसरली. गॅस सिलिंडरच्या स्फोटांमुळे आगीने रौद्ररुप धारण केले होते, अशी माहितीही देण्यात आली.

इटानगर पोलिसांच्या माहितीनुसार, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दलाच्या अहवालानंतरच कारण स्पष्ट होईल. आग लागल्याची माहिती मिळताच, जवळच असलेल्या अग्निशमन केंद्रात पोहोचलो. पण कुणीही कर्मचारी तिथे नव्हता. जेव्हा अग्निशमन बंब पोहोचले, त्यावेळी वाहनांमध्ये पुरेसे पाणीही नव्हते. आग लागल्यानंतर जवळपास एका तासाने टँकरमधून पाणी आणण्यात आले. तोपर्यंत आग वेगाने पसरली होती, असा आरोप दुकानदारांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *