नागपूर : फेसबुकवरील मैत्रीने केला घात, सैनिकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार

नागपूर : हैदराबादेत तैनात असलेल्या भारतीय लष्कर दलातील जवानाने नागपुरातील एका तरुणीशी फेसबुकवरून मैत्री केली. तिला नागपुरातील आलिशान हॉटेलमध्ये बोलवून तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून जवानावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. ही घटना तहसील पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. प्रितमसिंह वीरेंद्रसिंह तंवर (वय २३, रा. बुहाना, राजस्थान) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रितम सिंह हा भारतीय सैन्य दलात शिपाई पदावर कार्यरत असून सध्या हैदराबाद येथे तैनात आहे. पीडित २१ वर्षीय तरुणी रिया (काल्पनिक नाव) अमरावती येथील रहिवासी आहे. ती खेळाडू असून तिने मार्शल आर्टची खेळात प्राविण्य प्राप्त केले आहे. ती बी.ए.च्या अंतिम वर्षाला शिकत आहे. आरोपी प्रितम सिंह हा सुद्धा मार्शल आर्टचा खेळाडू आहे. २०१९ मध्ये फेसबुकवरून दोघांची ओळख झाली. त्याने यावेळी तिला मार्शल आर्टचे ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शवली. तसेच फिटनेसचे धडेही देण्यासाठी त्याने तरुणीला म्हटले. त्यानंतर दोघांचे नियमित फोनवर बोलणे सुरू झाले. १६ जुलै २०१९ रोजी त्याने तिला नागपुरात भेटायला बोलवले. दोघांची भेट झाली. यावेळी त्याने तिला प्रपोज करून लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर २६ जानेवारी २०२० ला त्याने रियाला पुन्हा नागपुरात भेटायला बोलावले.

प्रितमसिंह हा हैदराबादवरून नागपुरात आला तर रिया अमरावतीवरून नागपुरात आली. तहसील पोलिस ठाण्याच्या हॉटेल पॅराडाईजमध्ये त्याने रूम भाड्याने केली. दोघेही पती पत्नी असल्याचे सांगून थांबले. जवळपास तीन दिवस त्यांनी तेथे मुक्काम ठोकला. यादरम्यान लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शारीरिक संबंध निर्माण केले. त्यानंतर तिला स्थळ बघायला आले असता प्रितमसिंहने तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्यामुळे तिने आईवडिलांना सांगून लग्नाबाबत चर्चा केली. गेल्या काही दिवसांपासून रिया त्याला लग्नाबाबत विचारणा करीत होती. परंतु, तो तिला टाळाटाळ करीत होता. त्याने शेवटी तिला लग्नास नकार दिला असता तिने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *