गाझीपूर बॉर्डरवर भाजपा कार्यकर्ते आणि शेतकरी आंदोलक आमनेसामने; दगडफेक, गाड्यांची मोडतोड

नवी दिल्ली – गेल्या सात महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामध्ये वारंवार शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक होत आहे. दिल्लीतील गाझीपूर बॉर्डरवर आज आंदोलक शेतकरी आणि भाजपाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. मिळालेल्या माहितीनुसार भाजपाचे कार्यकर्ते गाझीपूर बॉर्डरवर भाजपाशी संबंधित एका नेत्याच्या स्वागतासाठी जमले होते. मात्र तिथे अचानक गोंधळाला सुरुवात झाली. आंदोलक शेतकऱ्यांनी गोंधळ घालून दगडफेक सुरू केली.

दरम्यान, येथील परिस्थिती एवढी बिघडली की, भाजपाच्या नेत्याच्या गाडीला तेथून बाहेर काढण्यासाठी पोलिसांना प्रयत्नांची शिकस्त करावी लागली. यादरम्यान, आंदोलक शेतकरी आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये हाणामारी झाली. या प्रकारानंतर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी भाजपावर अनेक गंभीर आरोप लावले. भाजपा नेते आमच्या मंचावर आले होते. तसेच ते त्यांच्या नेत्याचे स्वागत करत होते, ही बाब चुकीची होती, असे राकेश टिकैत म्हणाले.

शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले की, आंदोलनाचा मंच रस्त्यावर आहे याचा अर्थ असा नाही की, कुणीही मंचावर यावं. मंचावर यायचं असेल तर भाजपा सोडून या. मात्र आम्ही गाझीपूरच्या मंचावर भाजपाचा झेंडा फडकवून कब्जा केला, असे दाखवणे चुकीचे आहे. अशा लोकांना धडा शिकवला जाईल. ते प्रदेशात पुन्हा कुठेही जाऊ शकत नाहीत. हे लक्षात ठेवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *