कृषीमंत्री दादा भुसे यांनी लावली कांदा लिलावात 2400 रुपयाची बोली

कृषीमंत्री दादा भुसे यांनी कांदा लिलावात ग्राहक म्हणून सहभाग घेत रंगलेल्या चढावढीच्या लिलावात 2400 रुपये क्विंटलची बोली लावली.

सोनई (अहमदनगर) : घोडेगाव (ता.नेवासे) येथील बाजार समितीच्या व्यावसायिक दुकानांचे उदघाटन झाल्यानंतर कृषीमंत्री दादा भुसे यांनी कांदा लिलावात ग्राहक म्हणून सहभाग घेत रंगलेल्या चढावढीच्या लिलावात 2400 रुपये क्विंटलची बोली लावली. पुढे कुणीच बोली न वाढविल्याने 2400 रुपये एक वार..दोन वार..तीन वार..झाले. आणि त्यांच्यावर खरेदीदार म्हणून शिक्का पडला.

जलसंधारण मंत्रीशंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या नेवासे बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजारात बांधण्यात आलेल्या 29 कांदा आडतदार व्यावसायिक गाळ्यांचे कोनशिला अनावरण करुन कृषीमंत्र्यांनी उदघाटन केले. यानंतर त्यांनी उत्सुकता म्हणून कांदा लिलावात खरेदीदार म्हणून भाग घेतला. त्यांच्याशी लिलावात स्पर्धक व्यापारी म्हणून अशोक जरे, चंद्रकांत उरमुडे, शरद सोनवणे, सुदाम तागड यांनी सहभाग घेतला होता.

बाजार समितीचे सभापती डॉ. शिवाजी शिंदे व संचालकानी कृषी मंत्र्यांचा सन्मान केला. भुसे म्हणाले,”मंत्री गडाख हे नेहमी नेवासे तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकरी हिताचे प्रश्न घेवून येतात. कृषीपूरक संस्थाची काळजी व जपवणूक कौतुकास्पद आहे.” जलसंधारण मंत्री गडाख यांनी आज नव्याने कांदा खरेदी व्यावसायात उतरलेल्या शेतकरी युवकांना शुभेच्छा देत मी आणि संस्था सर्वांच्या पाठीशी आहे, असा विश्वास दिला.

संस्थेचे सचिव देवदत्त पालवे यांनी बाजार समितीची एकूण उलाढाल, राबवत असलेले शेतकरी हिताचे उपक्रम व राज्यात प्रसिद्ध असलेला जनावरांच्या बाजारविषयी माहिती दिली. उपस्थित मान्यवरांचा सत्कार संचालक मंडळाने केला. कोरोना स्थितीमुळे शासन नियमांचे पालन करुन कार्यक्रम संपन्न झाला. संचालक चंद्रकांत जाधव यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *