दुसऱ्यासाठी जगण्यातून मिळणारं समाधान पैशात नाही डॉ – प्रकाश आमटे यांचे प्रतिपादन

अमरावती | तंत्रज्ञानामुळे समाजात मोठ्या प्रमाणात वैचारिक बदल होत आहेत. नंदकुमार व आरती पालवे सारखे तरुण आपलं दुःख विसरून दुसऱ्यांसाठी जागत आहे हे कार्य प्रत्येकाला प्रेरणा देणारे आहे. दुसऱ्यासाठी जगण्यातून मिळणारा समाधान पैशातून मिळत नाही असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे यांनी केली.

जाणीव प्रतिष्ठानतर्फे आयोजित आम्ही सारे कार्यकर्ता पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातिला महात्मा ज्योतिबा फुले व संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शेतकरी नेते चंद्रकांत वानखडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेवक डॉ प्रकाश बाबा आमटे, ज्येष्ठ विचारवंत व संपादक श्रीपाद अपराजित,  सत्कार मूर्ती डॉ. नंदकुमार पालवे व आरती पालवे उपस्थित होते.

सामाजिक क्षेत्रात झोकून देऊन काम करणाऱ्या युवा कार्यकर्त्यांमध्ये नवी उमेद निर्माण व्हावी या करिता शेतकरी नेते चंद्रकांत वानखडे यांच्या कृतज्ञता निधीतून जाणीव प्रतिष्ठानवतीने अनाथ मतिमंद यांचे पुनर्वसन करणाऱ्या पळसखेड येथील डॉ. नंदकुमार पालवे व आरती पालवे यांना आज रविवार दि. २८ नोव्हेंबर रोजी अभियंता भवन येथे संपन्न झालेल्या दिमाखदार सोहळ्यात ‘आम्ही सारे कार्यकर्ता पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. एक लक्ष रुपयाचा धनादेश, शाल, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

पुढे बोलताना डॉ. प्रकाश बाबा आमटे म्हणाले की, संत गाडगे महाराज यांनी कुटुंबाचा विचार न करता स्वतःला मानव सेवेत गुंतवले. समाजातील भांडण व असूया दूर करण्यासाठी मानवता धर्माचे आचरण आवश्यक आहे.

यावेळी बोलताना ज्येष्ठ विचारवंत व संपादक श्रीपाद अपराजित म्हणले की, माणसाने ‘मी’ पणा सोडल्यावर ‘आम्ही सारे’ ची निर्मिती होते. तर अहंभाव सोडल्यावर हेमलकसा जन्म घेतो. भूतकाळातून बोध घेतल्यास वर्तमानात सुधारणा होते. संवेदना समजून न घेता माणसं बोलत सुटली आहेत समाजभान ठेवत काय बोलावे यापेक्षा काय बोलू नाही याचं भान येणं आवश्यक आहे. जातीय द्वेषाला समोर गेलेले अमरावतीकर आज एकत्रित आले आहेत. यातून आम्ही सारे प्रेमाने जग जिंकू शकतो हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

शेतकरी नेते चंद्रकांत वानखडे म्हणाले की, सामाजिक दुष्काळात असलेल्या कार्यकर्त्यांना खत पाणी देण्यासाठी आम्ही सारे कार्यकर्ता पुरस्कार देण्याचा आमचा संकल्प आहे. एवढ्या कमी वयात डॉक्टर नंदकिशोर व आरती पालवे हे दीडशेपेक्षा अधिक मनोरुग्णांचे माय बाप झाले. त्यांच्या कार्याला मिळणारे बढ समाधान देणारे आहे. कुणाच्या समाजकार्याची कॉपी करता येत नाही मात्र तरुणांनी अशा समस्या शोधून त्यावर शाश्वत उपाय करावा आम्ही सारे त्याच्या पाठीशी उभे आहोत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आशिष लोहे यांनी केले. संचालन राहुल तायडे यांनी केले. तर आभार आशिष कडू यांनी मानले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जाणीव प्रतिष्ठानचे नितीन चौधरी, आशिष कडू, डॉ. हरिश बिंड, डॉ.मुकेश टापरे, सुधीर दरणे, डॉ. पराग सावरकर,  आकाश देशमुख, दिपक तायडे, रवींद्र मोरे, अली असगर कोवैतवाला,  विद्या लाहे, सोनाली देवबाले, प्रदीप पाटील, जयंत सोनोने, अन्वय जवळकर व जाणीव प्रतिष्ठाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

  • कुटुंबव्यवस्थेचा ऱ्हास मनोरुग्णांच्या वाढत्या संख्येचे मूळ आहे – डॉ. नंदकुमार पालवे सेवेचा संकल्प घेताना दिशा निश्चित नव्हती मात्र भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आमच्या कामाला दिशा दिली. सेवा संकल्प प्रतिष्ठान येणाऱ्या मनोरुग्णांची पार्श्वभूमी बघितल्यास अनेक अस्वस्थ करणारे सत्य समोर आले आहेत. कुटुंबातील माणसांचा एकमेकांशी संवाद तुटला आहे. कुटुंब व्यवस्थेचा झालेला ऱ्हास हाच मनोरुग्णांच्या वाढत्या संख्येचे कारण आहे.
    मानसिक अस्वस्थता असलेल्या लोकांसोबत संवाद साधल्यास त्यांना समजून घेतल्यास ही संख्या कमी होऊन सामाजिक समतोल साधता येतो मनोरुग्णांना बरं करण्यासाठी औषध हे फक्त 20 टक्के काम करते तर संवाद हा 80% काम करतो त्यामुळे मनोरुग्णांना समजून घेण्यासाठी स्पर्शाची भाषा ही खूप महत्त्वाची ठरते. पळसखेड जवळ होळीच्या काळात अनेक रुग्णांना देव आरस्पानी सोडून दिले जाते मनोरुग्ण महिलांवर अमानुषपणे अत्याचार केले जातात हे थांबवण्यासाठी संवेदनशीलपणे या लोकांकडे पाहणे आवश्यक आहे.  सेवा संकल्प मध्ये वर्गणी येण्यासाठी अनेक जण तयार आहेत मात्र मनोरुग्णांचे दुःख व त्यातून निर्माण झालेली त्यांची अवस्था समजून घेऊन त्यांच्याशी बोलण्यासाठी दहा मिनिटे द्या असे आवाहन डॉ. नंदकुमार पालवे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *