‘करियर कट्टा’: प्राचार्य व करियर समन्वयक विभागीय कार्यशाळा

  • श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे दिनांक ३० नोव्हेंबर रोजी आयोजन
  • विद्यार्थ्यांना भविष्यवेधी उपक्रमात सामील करून घेण्यासाठी उत्तम संधी – प्राचार्य डॉ जी व्ही कोरपे

श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती अंतर्गत कार्यरत व्यवसाय मार्गदर्शन व उद्योजकता विकास कक्षाद्वारा “करिअर कट्टा” या महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त उपक्रमावर आधारित प्राचार्य व समन्वयक कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. हि कार्यशाळा दिनांक ३० नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी ३.०० वाजता महाविद्यालयाच्या सर सी व्ही रमण सभागृहामध्ये पार पडणार आहे.

महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अत्यावश्यक असलेल्या स्पर्धा परीक्षा तसेच उद्योजकता विकासाबद्दल राबविण्यात येत असलेल्या नाविन्यपूर्ण संकल्पनेबद्दल संगोपांग चर्चेतून मार्गदर्शन प्राप्त होणार आहे. या कार्यशाळेमध्ये अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित, उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत कार्यरत सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य व व्यवसाय मार्गदर्शन तथा उद्योजकता विकास कक्षाचे समन्वयक प्राध्यापक सहभागी होणार आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांबद्दल तसेच उद्योग निर्मिती व विकासाबद्दल परिपूर्ण मार्गदर्शन तसेच सहाय्य उपलब्ध करून देणे हा “करिअर कट्टा” या उपक्रमाचा प्रमुख हेतू आहे. या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष मा. यशवंत शितोळे उपक्रमांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना, कार्यक्रम, अभ्यासक्रम, याबद्दल सविस्तर माहिती सादर करणार आहेत. श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी व्ही कोरपे यांच्या अध्यक्षतेत या कार्यशाळेचे उद्घाटन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव श्री शेषरावजी खाडे करणार आहेत. यानिमित्ताने डॉ व्ही जी ठाकरे, संचालक, उच्च शिक्षण, श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती; डॉ मुरलीधर वाडेकर, सहसंचालक, उच्च शिक्षण, अमरावती विभाग; डॉ व्ही आर मानकर, सहसंचालक, तंत्रशिक्षण, अमरावती विभाग आणि डॉ अविनाश मोहरील, प्राचार्य, महिला महाविद्यालय, अमरावती मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

‘या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याच्या दृष्टीने महाविद्यालयांच्या महत्वपूर्ण भूमिकेला आवश्यक असलेली जोड मिळणार असून सर्व सन्माननीय प्राचार्य आणि प्राध्यापकांच्या चर्चेतून करीयर कट्टा या भविष्यवेधी उपक्रमात सामील करून घेण्यासाठी सर्वोत्तम प्रक्रिया विकसित करण्यासाठी सर्वांनी कार्यशाळेत आवर्जून सहभागी व्हावे’ – प्राचार्य डॉ जी व्ही कोरपे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *