omicron : मोठा दिलासा! देशात एकही ओमिक्रॉनचा रुग्ण नाही, केंद्राची माहिती

संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राज्यसभेत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी देशाला दिलासा देणारी बातमी दिली आहे. राज्यसभेत मनसुख मांडवीय यांनी ही माहिती दिली. देशात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण अद्यापतरी आढळलेला नाही, असे मांडवीय यांनी सांगितले.

आतापर्यंत १६ देशांमध्ये ‘ओमिक्रॉन’ वेरियंट संसर्ग पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिका, बॉट्सवाना, ब्रिटन, नेदरलंड, जर्मनी, हॉंगकॉंग, इटली, बेलजियम, इस्रायल, डेन्मार्क, ऑस्ट्रिया, झेक रिपब्लिक, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, पोर्तुगाल आणि स्पेन या देशांमध्ये ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग झाल्याचे रुग्ण आढळले आहेत.

दरम्यान, संसद अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज विरोधी पक्षांनी खासदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी केली. विरोधकांनी मोठा गदारोळ केला. पण राज्यसभेचे सभापती एम. व्यकय्या नायडू यांनी त्यांनी मागणी फेटाळून लावली. यामुळे नाराज विरोधकांनी सभात्याग केला. यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी ‘ओमिक्रॉन’बाबत राज्यसभेत ही माहिती दिली.

दरम्यान, ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग असलेल्या देशांमधून कर्नाटक येणाऱ्या सर्व प्रवाशांवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे. संबंधित प्रवाशांच्या सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर चाचण्या केल्या जात आहेत, अशी माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *