चीनमध्ये लॉकडाऊन विरोधातील आंदोलनात १० जणांचा मृत्यू

बीजिंग : कोरोनाचे केंद्र असलेल्या चीनमध्ये पुन्हा कोरोनाने डोके वर काढले असून त्यामुळे सरकारची चांगलीच पंचाईत झाली आहे. अनेक शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊनचा मार्ग स्विकारल्याने संतप्त झालेले नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. लॉकडाऊनविरोधातील या आंदोलनात १० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये ३० हजारांहून अधिक दैनंदिन रुग्णांची नोंद होत आहे. दिवसेंदिवस हा आकडा वाढताना दिसत आहे. बहुतेक रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत. त्यामुळे चीन सरकारने पुन्हा एकदा झिरो कोविड धोरण लागू करत अनेक शहरांमध्ये कठोर निर्बंध आणि लॉकडाऊन लागू केला आहे. दुसरीकडे, राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या शून्य कोविड धोरणालाही देशात विरोध होऊ लागला आहे. लॉकडाऊन मागे घेण्याची मागणी करत लोक रस्त्यावर उतरले आहेत.

नानजिंग आणि बीजिंगसह अनेक शहरांमधील विद्यापीठांमधील विद्यार्थी शांततापूर्ण निदर्शनांसाठी हातात कोरे कागद घेऊन दिसले. मात्र त्यानंतर आंदोलन तीव्र झाले. या आंदोलनात १० जणांचा मृत्यू झाला. याचे अनेक फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. देशात कोरोना संसर्गाची प्रकरणे वेगाने वाढत आहेत आणि रविवारी एका दिवसात ४० हजार नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. देशात सलग चौथ्या दिवशी संसर्गाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. एप्रिलमध्ये शांघायसारख्या मोठ्या शहरांमध्ये प्रकरणांमध्ये वाढ झाल्यापासून ही संख्या सर्वाधिक आहे.

चीनची राजधानी बीजिंगमध्ये परिस्थिती अधिक चिघळताना दिसत आहे. बीजिंगमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. क्वारंटाईन सेंटरमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. नवीन क्वारंटाईन सेंटर उभारली जात आहे. बीजिंगमधील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनबाबत आणि कठोर निर्बंधांमुळे अन्नपदार्थ आणि इतर आवश्यक वस्तूंची मागणी वाढली आहे. लोक घाबरून सुपरमार्केट आणि ऑनलाइन साईटवरून जीवनावश्यक वस्तूंची प्रचंड खरेदी करत त्यांचा साठा करत आहे.

चीनमध्ये कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. शहरातील बहुतेक नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. जागोजागी नाकाबंदी करण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी प्रवेश देण्याआधी कोरोना अहवाल तपासला जात आहे. अनेक शहरांमध्ये मॉल, सिनेमागृहे बंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *