सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘ड्रोन तंत्रज्ञान’ अभ्यासक्रम

पुणे – तंत्रज्ञानातील महत्वाची क्रांती मानले जाणारे ड्रोन तंत्रज्ञान आता विद्यार्थ्यांना अभ्यासता येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लवकरच याबाबतचे पदवी तसेच प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु होत आहे. यासाठी विद्यापीठाने फोरफोर्सेस ऐरो प्रॉडक्ट इंडिया लिमिटेड या कंपनीसोबत सामंजस्य करार केला. या करारानुसार विद्यापीठात दोन प्रमाणपत्र तसेच पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना सुरुवात करण्यात आली आहे.

या करारावर नुकतेच स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन.एस. उमराणी, नवसंशोधन नवोपक्रम आणि साहचर्य विभागाच्या संचालिका डॉ.अपूर्वा पालकर, तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर तसेच ‘फोरफोर्सेस’चे पदाधिकारी देखील ऑनलाईन पध्दतीने उपस्थित होते.

या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून राबविण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येईल व त्यातून विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.

नव्याने सुरु झालेले अभ्यासक्रम
प्रमाणपत्र अभ्यासक्रम
-इंट्रोडक्शन टू ड्रोन टेक्नॉलॉजी (कालावधी – २ आठवडे )
-अड्वान्स कोर्स ऑन ड्रोन टेक्नॉलॉजी (कालावधी – १२ आठवडे )
-ड्रोन पायलट ट्रेनिंग कोर्स (एक ते दोन आठवडे)

पदवी अभ्यासक्रम – बॅचलर ऑफ ऑटोनॉमस व्हेईकल (कालावधी – तीन वर्षे)

पदव्युत्तर पदवी – मास्टर ऑफ ऑटोनॉमस व्हेईकल (कालावधी – दोन वर्षे)

अभ्यासक्रमांची वैशिष्ट्ये
* फोरफोर्सेस कंपनीकडून या विषयातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन
* विद्यार्थ्यांना थेअरी अभ्यासक्रमाबरोबर प्रात्यक्षिकही करण्याची संधी
* विविध कंपन्यांमध्ये इंटर्नशिप मिळण्यासाठी सहाय्य
* टाटा ऍडव्हान्स सिस्टिम लिमिटेड, भारत फोर्ज, महिंद्रा डिफेन्स सिस्टिम लिमिटेड आदी कंपन्यांमध्ये नोकरीची संधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *