94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत आठ ऑगस्टला निर्णय

औरंगाबाद : नाशिकमध्ये होवू घातलेले 94 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार का नाही? याबाबत येत्या आठ तारखेला निर्णय होणार असल्याची माहिती कार्यवाह दादा गोरे यांनी एबीपी माझाला दिली आहे. 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मध्यंतरी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत कोरोनाची स्थिती पाहता 26, 27 व 28 या तारखांंना ठरलेले 94 वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन साहित्य महामंडळाला स्थगित करावे लागले.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी आयोजक संस्थेला पत्र पाठवून संमेलन होणे शक्य आहे का? याबाबत 31 जुलैपर्यंत कळवावे असं म्हटलं होतं. या पत्रात ठाले-पाटील यांनी असं म्हटलं होतं की, स्वागतमंडळाची व निमंत्रक संस्थेची या साहित्य संमेलनासंबंधी काय भूमिका असणार आहे? हे जाणून घेणे व आपले म्हणणे महामंडळाला अवगत करून देणे आवश्यक वाटते. आज कोरोनाची परिस्थिती नाशिकला साहित्य संमेलन घेण्यासारखी आहे का? महाराष्ट्र शासन व नाशिकचे प्रशासन संमेलन घेऊ देण्यास अनुकूल प्रतिसाद देतील का? नाशिकमधील व जिल्ह्यातील लोकांची संमेलन घेण्याबाबत या परिस्थितीत मनःस्थिती कशी आहे? आणि मुख्य म्हणजे आयोजक संस्था म्हणून आपली व लोकहितवादी मंडळाची व स्वागतमंडळाची याही परिस्थितीत वरील सर्व गोष्टींवर मात करून साहित्य संमेलन घेण्याची तयारी आहे का? तयारी असेल तर कधीपर्यंत म्हणजे कोणत्या महिन्याच्या कोणत्या आठवड्यात संमेलन घेण्याची तयारी आहे.

महाराष्ट्र शासनाने (वर्ष उलटून गेल्यामुळे) अनुदान नाकारले तर आपण काटकसरीचा मार्ग अनुसरला तरीही आटोपशीर साहित्य संमेलनाला आवश्यक असणारा निधी जमा होईल का? ह्या सर्व प्रश्नांचा विचार करून संमेलनासंबंधीची लोकहितवादी मंडळाची व स्वागतमंडळाची भूमिका स्पष्टपणे कळवावी असं त्यांनी म्हटलं होतं.

यानंतर छगन भुजबळ यांनी कोरोनाच्या दुसरा लाटेतून नाशिक कर आता कुठे सावरत आहे. त्यात पुढील महिन्यात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असल्याने त्यामुळे गर्दी होण्याचा धोका जास्त वर्तवला जात आहे, त्यामुळे साहित्य संमेलन शक्य नसल्याचं म्हटलं आहे.

यानंतर या वर्षीचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घ्यायचं की नाही याबाबतचा निर्णय 8 ऑगस्टला घेण्यात येणार असल्याची माहिती कार्यवाह दादा गोरे यांनी एबीपी माझाला दिली आहे. नाशिकमध्ये संमेलन होणार की नाही, ऑनलाईन संमेलन घेता येईल का याबाबत साहित्य महामंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. औरंगाबादमध्ये होणाऱ्या या बैठकीत हा निर्णय होईल. त्यामुळे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार की नाही याबाबतचा निर्णय येत्या आठ तारखेला होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *