अमरावतीत कॉलराचे थैमान, 2 वर्षांच्या चिमुकलीने सोडला जीव,आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू

अमरावती, 28 जुलै: अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये 90 दिवसांत 52 बालके दगावल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कॉलराची लागण झाल्याने कॉलराची लागण झाल्यामुळे एका 2 वर्षी चिमुरडीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर कॉलरामुळे जिल्ह्यात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
अचलपूर तालुक्यातील शिंदी बू. गावातील वेदश्री निलेश मेहरे वय 2 वर्ष या चिमुकलीला कॉलराची लागण झाल्याने तिच्यावर सावंगी मेघे येथे उपचार सुरू असताना काल अखेर मृत्यू झाला, तिच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे.
सिंदी गावातील पाणीपुरवठा योजना चार वर्षापासून बंद आहे. त्यामुळे लोकसहभागातून बोरवेल करून घेतल्या आहेत. या बोअरवेलमधून गावकऱ्यांनी टाकलेल्या पाइपलाइन चक्क सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यामधून गेल्या आहेत. त्यामुळे हेच दूषित पाणी गावकरी पितात त्यामुळे वैदश्रीचा मृत्यू झाला असा आरोप गावकऱ्यांनी केला.
दरम्यान, कुपोषणाने ग्रासलेल्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात अवघ्या तीन महिन्यात तब्बल 52 बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आहे. मृतांमध्ये उपजत १७ आणि शून्य ते सहा वर्षे वयोगटातील ३५ बालकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, गंभीर समजल्या जाणाऱ्या तीव्र कुपोषणाने ४०९ बालक पीडित आहेत. धारणी व चिखलदरा तालुक्यात न्यायालयाच्या निर्देशानुसार शासनाच्या विविध योजना कार्यान्वित आहेत. बालविकास प्रकल्प कार्यालयांतर्गत दोन्ही तालुक्यात ४२५ पेक्षा अधिक अंगणवाडी केंद्रांतून स्तनदा, गर्भवती माता व शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना पौष्टिक आहार शिजवून दिला जातो. जलजन्य आजाराची लागण होऊन कमी होणारे वजन आणि विविध आजारांनी मृत्यू पाहता मेळघाटातील बालकांची पावसाळ्यात अत्यंत जोखीम असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *