अमरावती शहरात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानाला सुरुवात…

शहरात आरोग्य विभागाच्या वतीने ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या मोहीमे अंतर्गत १८ वर्षांवरील महिला, माता, गरोदर स्त्रियांसाठी आरोग्य तपासणी अभियान सुरू करण्यात आले आहे. सुरक्षित व सदृढ आरोग्यासाठी समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ अभियान राबविले जात आहे. या अभियानातून महिलांची तपासणी करण्यात आली आहे.

शहरात माता व बाल मृत्यूचे प्रमाण कमी होत असले तरी गरोदरपणात महिलांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण अत्यल्प आढळत असते. शहर आणि अतिदुर्गम भागात तर महिलांच्या आरोग्य तपासणीकडे कुटुंबाकडून बऱ्याचदा दुय्यम स्थान देण्यात येत असते. प्रामुख्याने घरातील स्त्री आरोग्यदृष्ट्या सशक्त असेल तर घर सुरक्षित ही संकल्पना घेऊन नवरात्रोत्सवाच्या काळात ही योजना राबविण्यात येत आहे.

शहरातील शहरी आरोग्य केंद्रात आरोग्य शिबिरे घेण्यात येणार असून वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविकांच्या मदतीने यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला. महिलांच्या आरोग्यासाठी आवश्यक त्या सर्व चाचण्या व तपासणी या काळात करण्यात येणार आहे. तसेच आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक तसेच उपचारात्मक सुविधाही देण्यात येणार आहेत.

अभियानामार्फत महिला व मातांची वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी केली जाणार आहे. हिमोग्लोबीन, साखरेचे प्रमाण, लघवीची नियमित तपासणी केली जाणार आहे. मॅमोग्राफी, छातीचा एक्सरे, ३० वर्षांवरील सर्व महिलांची कर्करोग स्क्रिनिंग, रक्तदाब स्क्रिनिंग, मधुमेह स्क्रिनिंग केले जाणार आहे. माता व बालकांचे लसीकरण, सोनोग्राफी केली जाणार असून, आवश्यकतेनुसार औषधोपचारही केले जाणार आहेत. ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ मोहिमेची शहरात सुरुवात झाली आहे. अठरा वर्षे वयोगटापासून पुढे सर्व महिलांनी आपल्या नजीकच्या शहरी आरोग्‍य केंद्रात जावून जाऊन आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी डॉ.विशाल काळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *