टाटा एअरबस प्रकल्पासाठी छगन भुजबळांनी केला होता पत्रव्यवहार, रतन टाटांकडे केली होती ‘ही’ मागणी

मुंबई : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापलं होतं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला हा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळं धारेवर धरलं होतं. अशातच आता टाटा एअर बस प्रकल्पही गुजरात जाणार असल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता टाटा एअर बस प्रकल्पासंदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी रतन टाटा यांना एअर बस प्रकल्पाबाबत पत्रव्यवहार केला होता.

टाटा एअर बस प्रकल्प महाराष्ट्रात आणि विशेषत: नाशिक मध्ये व्हावा, अशी मागणी भुजबळ यांनी पत्राद्वारे केली होती. नाशिक मध्ये हा प्रकल्प सुरु करा, टाटा ग्रुप समुहाला लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा देण्यात येतील, असं आवाहनही भुजबळ यांनी केलं होतं. त्यामुळे आता शिंदे सरकार आणि विरोधकांमध्ये नव्या वादावा तोंड फुटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

टाटा एअर बस प्रकल्प गुजरातला जाणार असल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे, या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, २२ हजार कोटींची गुंतवणूक आहे.ती वाढणार आहे. भारत सरकारनं करार केला, त्यानंतर एक महिन्याने मी रतन टाटा यांना पत्र पाठवलं होतं. त्याला आता वर्ष झालं. नाशिक मध्ये हा एअर बस प्रकल्प उभारण्याचं आवाहन केलं होतं.

एका पाठोपाठ एक प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जात आहेत. टाटा महाराष्ट्राला प्राधान्य देतात, पण यावेळी काय झालं? महाराष्ट्रातल्या युवकांनी टाळ्या वाजवायच्या,फटाके फोडायचे,हनुमान चालीसा म्हणायची, फडणवीस यांनी गुजरात नव्हे तर महाराष्ट्राचे नेते आहेत याचं भान ठेवावे. शिंदे नाही, फडणवीस हे करू शकतात, त्यांनी नागपूरला प्रकल्प नेला तरी हरकत नाही. पूर्वीच्या सरकारने काय केलं, आता सरकार काय करत आहे? यापेक्षा प्रकल्प महाराष्ट्रात येणं महत्वाचं आहे.

दिल्लीतल्या महाराष्ट्रातील नेत्यांनी असे प्रकल्प महाराष्ट्रात येण्यासाठी प्रयत्न करावेत,फडणवीस यांच्या शब्दाला दिल्लीत किंमत आहे,त्यांनीही महाराष्ट्रात प्रकल्प आणावेत. रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी प्रकल्प महाराष्ट्रात आणून रोजगार उपलब्ध करून द्यावा, असं माध्यमांशी बोलताना भुजबळ म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *