नागपूर विधानभवनातील शिवसेना कार्यालयावर पडदा; पुन्हा वादाची शक्यता?

नागपूर विधानभवन परिसरात सर्व प्रमुख राजकीय पक्षांची कार्यालये आहेत. भाजपच्या बाजूला शिवसेनेचे कार्यालय आहे. पण सध्या शिवसेना दोन गटांत विभागली गेली आहे. त्यामुळे येत्या हिवाळी अधिवेशनात हे कार्यालय शिंदे गटाचे की ठाकरे गटाचे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. सध्या तरी प्रशासनाने या कार्यालयावर पडदा टाकलेला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेऊन केलेल्या बंडानंतर ‘शिवसेना’ कुणाची हा वाद सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयात यावर आज सुनावणी होणार होती. पण ती पुढे ढकलण्यात आली आहे. धनुष्यबाण हे चिन्ह सध्या कुणाकडेच नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव मिळाले असून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष’ असे नाव मिळाले आहे. ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाला सध्या ढाल तलवार हे चिन्ह मिळाले असून ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाला मशाल हे चिन्ह मिळाले आहे.

19 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाकरिता विधानभवन परिसरात रंगरंगोटीसह विविध कामे सुरू आहेत. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या कार्यालयाचे फलक स्पष्टपणे दिसत आहेत. तर शिवसेना पक्ष कार्यालयाच्या फलकावर मात्र ‘पडदा’ टाकण्यात आला आहे. त्यामुळे हे कार्यालय शिवसेनेच्या कोणत्या गटाला मिळणार यावरून अद्याप स्पष्टता नाही. सत्तेत असलेल्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षातर्फे या कार्यालयावर दावा करण्यात येईल, याची शक्यता जास्त आहे. असे असले तरी ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाद्वारे सहज या कार्यालयावरून दावा सोडण्यात येईल, असेही होणार नाही. येथील शिवसेना पक्ष कार्यालय शिवसेनेच्या दोन्ही पक्षांना विभागून देण्यात येईल अशीही चर्चा आहे. 2019 मध्ये झालेल्या अधिवेशन काळातील शिवसेना पक्ष कार्यालयासमोर लागलेला एक स्वागताचा बॅनर येथे बघायला मिळाला. या बॅनरवर ‘महाराष्ट्र विधानमंडळ शिवसेना पक्ष’ असा उल्लेख करण्यात आला आहे.

नागपुरात 19 डिसेंबरपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे़. यापूर्वी 2019 मध्ये नागपुरात हिवाळी अधिवेशन झाले होते. गेली दोन वर्षे कोरोना संक्रमणामुळे नागपुरात हिवाळी अधिवेशन होऊ शकले नाही. दोन वर्षानंतर होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची तयारी जोरात सुरू आहे. विधानभवन परिसरात विविध पक्षांची कार्यालये आहेत. भाजप कार्यालयाला लागूनच शिवसेना पक्ष कार्यालय देखील आहे़. शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठविण्यात आले असून शिंदे गट व उद्धव ठाकरे गटात शिवसेना विभागली गेली आहे. खरी शिवसेना आमचीच असा दावा दोन्ही गटांकडून होत असताना, विधानभवन परिसरातील शिवसेना पक्ष कार्यालयावर दावा कुणाचा? हा विषय सध्या चांगलाच चर्चेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *