जागतिक महिला दिन विशेष : आता तिची ‘पाळी’

✒️ क्षिप्रा मानकर

महिला दिन आलाय. ती मात्र घराच्या एका कोपऱ्यातच पडलेली. काय तर म्हणे, तीन दिवस घराबाहेर पडायची मुभा नाही. कशाला हातदेखील लावायचा नाही. न राहवून फोन केला, ‘तृप्ती कुठे हरवलीस? ८ मार्चची तयारी विसरलीस का? बॅनर, पत्रिका, सन्मानचिन्हे सर्व आणायला आज जायचे आहे ना.’ तृप्ती म्हणाली, ‘यावेळी नाही जमणार गं, तुम्ही सर्वजणी जाऊन या…’ विश्वास बसेना ही तीच तृप्ती का?
तृप्तीशिवाय कार्यक्रम आयोजन शक्यच नाही म्हणून मैत्रिणींनी थेट तिचे घर गाठले. दारात पाय ठेवताच, तिची वहिनी म्हणाली, ‘दुरूनच भेटा वन्सला.’ मैत्रिणी मुकाट्याने तृप्तीच्या खोलीत गेल्या. एका कोपऱ्यात तृप्ती भिंतीला डोके टेकवून शांत बसली होती. वर्षभरापूर्वी नवरा गेला. सासरच्यांनी सर्व हक्क काढून घेतले. दोन मुलांना घेऊन माहेरी आली. नवी नोकरी शोधली. मैत्रिणींमधे रुळली. जगायला शिकली. प्रचंड उत्साही असलेल्या तृप्तीची त्या तीन दिवसांत चिडचिड व्हायची. त्या अवघड दिवसांना प्रत्येकच स्त्रीला दर महिन्याला सामोरे जावेच लागते. परंतु तृप्तीची गोष्ट निराळी वाटली.
मैत्रिणींना समोर बघून तिचा बांध फुटला. म्हणाली, लहानाची मोठी झाली. वयात आली, परंतु मासिक पाळीची कुणकुण कधी बाबा, दादाला लागली नाही. आईच्या मायेच्या स्पर्शाने तर त्या कळांनी मी कधी कळवळली नाही. परंतु नशिबाने वैधव्य आला अन् पुन्हा माहेरी यावे लागले. आता माहेर माहेर वाटत नाही. महिन्याचे ते नाजूक दिवस आता बोचरे झालेत. दर महिन्याला वहिनीने मासिक पाळी हा विषय भांडणाचा करून टाकला. वन्स इथे हात लावू नका, तिथे बसू नका, देवघरात जाऊ नका! चुकून कधी खोलीतून बाहेर पडलेच तर वहिनी गोमूत्र घेऊन मागेच. घरात नुसता एकच कल्लोळ.

मैत्रिणींनी तिला सावरले, ‘ए गप गं तृप्ती. जग किती पुढे गेले. तू काय हे पाळीपुराण घेऊन बसली.’ धीर मिळाल्याने तृप्ती सावरली. ‘ऐक तृप्ती, तुझे विचार जगाच्या पलीकडे आहेत. पुरोगामी आहेत, ज्याची समाजाला गरज आहे. असे कोठडीत बंद करू नकोस. मागे खेचणारे असे अनेक लोक पावला-पावलावर मिळतील. आज मासिक पाळी विषय आहे. उद्या आणखी नवा विषय असेल. रडत थांबायचे की हसत जगायचे तुझे तू ठरव.’ तृप्ती सावरली. कार्यालयाचा महिला दिन असंख्य मैत्रिणींसोबत दणक्यात साजरा झाला. तृप्तीचे यंदाचे भाषण ‘आता तिची पाळी’ तर महिलांनी डोक्यावर घेतले.
या दिवसांत प्रेमाचा स्पर्श, काळजीचे शब्द हवे असतात प्रत्येकीला. जग बदलले. सर्व क्षेत्रांत स्त्रिया पुढे गेल्या. अगदी पृथ्वीच्या कक्षेबाहेरही झेपावल्या, तरी समाज तिला त्या तीन दिवसांत जखडू पाहतो. निसर्ग नियमानुसार स्त्रियांच्या लैंगिकतेमध्ये, पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका निभावणारी मासिक पाळी स्त्रियांनीच अधिक बाटवून टाकली आहे. हे नियम लावणारे आपणच आहोत. हा विषय तिचा तिच्यापुरताच असताना त्याला चव्हाट्यावर का आणले जात असेल, की आपण स्वतःच त्याचा बाऊ करतोय? मान्य आहे की पाळी येण्यापूर्वी जाणवणारी लक्षणे ही तीव्र असतात, ज्याचा स्त्रियांच्या कामावर, वागण्यावर परिणाम दिसतो. याउपरही पाळीदरम्यान किंवा रजोनिवृत्तीनंतर शरीराइतकेच मनःस्वास्थ जपणे गरजेचे आहे.

मासिक पाळीचे रक्त दूषित असते, या भोंदूगिरी विचारांना फाटा देऊन एका नवनिर्मितीला प्रसवणारे हे रक्त किती पवित्र आहे याचे दाखले आपण स्त्रियांनी खुल्या मनाने दिले पाहिजे. विविध चर्चासत्रांतून जेव्हा हा विषय खुला होतो, तेव्हा आपल्यातीलच काही जणी त्यांना, ही बाई केवढी उघडपणे बोलते म्हणून नावे ठेवतो. एक गोष्ट आपणही लक्षात ठेऊया, हा विषय संपणारा नाही. तो निसर्गाने आपल्याला दिलेला आहे. जोपर्यंत आपणच आपल्या शरीराचा सन्मान करणार नाही, तोपर्यंत इतरही करणार नाही. तेव्हा मुलगी वयात येताना त्या अवघड क्षणांची चर्चा करायला आईनेही अवघडू नये. मासिक पाळी नाही तर, ‘आता तिची पाळी’ म्हणत या दिवसांत तिला मानसिक आधार देऊया. या दिवसांत तिला घरात न थांबवता गगनभरारी घेण्यासाठी प्रवृत्त करूया. सोबत करूया. चला, प्रत्येक दिवस आपला समजून हक्काचा महिला दिन रोजच साजरा करूया…

(प्रस्तुत लेखिका, निवेदिका, व्याख्यात्या, समुपदेशक तथा जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश प्रसिद्धीप्रमुख आहेत)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *