सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे आरोग्य सुविधेसाठी १३० कोटींचा निधी मंजूर

  • आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या प्रयत्नांना यश
  • कँसर उपचारासाठी रेडिओथेरपी आणि डे – केअर किमोथेरपीची आरोग्य सुविधा

अमरावती २२ मार्च :- विविध जटिल व दुर्धर आजारांच्या प्रभावी उपचार व शस्त्रक्रिया तसेच अत्यावश्यक आरोग्यसेवेच्या उपलब्धतेसाठी वरदान ठरणाऱ्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथील आरोग्य सेवांना अधिक बळकटी व विस्तारीकरणासाठी आमदार सौ. सुलभाताई खोडके यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरु आहे. दरम्यान कँसर सारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र युनिट व त्याठिकाणी आवश्यक वैद्यकीय संसाधने उपलब्ध करण्याला घेऊन आमदार सौ. सुलभाताई खोडके यांचे प्रयत्नांनी गेल्या डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशन २०२३ च्या पुरवणी मागणीत मंजूर करण्यात आलेला २० कोटींचा निधी देखील वितरित करण्यात आला. परंतु वैद्यकीय उपकरणे व संसाधनासाठी निधी कमी तरतुद करण्यात आल्याने कर्करोगासाठी आवश्यक अतिविशेषोपचार सेवा सुरु करणे शक्य नसल्याने आता विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय नाशिक व अमरावती येथील कर्करोग उपचारासाठी यंत्र सामुग्री व वैद्यकीय उपकरणे खरेदीची बाब वगळून त्याऐवजी रेडिओथेरपी आणि डे -केअर किमोथेरपीची आरोग्य सुविधा खाजगी भागीदारी तत्वावर (पीपीपी ) सुरु करण्यास १३० कोटी रकमेच्या प्रस्तावास शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. याबाबत आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री ना.अजितदादा पवार व सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. डॉ. तानाजी सावंत यांचे आभार मानले आहे.

सध्या कँसर या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहे. मात्र शासकीय रुग्णालयांमध्ये कँसर या आजारावर प्रभावी उपचार करणारे युनिट नसल्याने कँसरग्रस्त रुग्णांना मुंबई , नागपूर, पुणे सारख्या शहरांमध्ये उपचारासाठी जावे लागते . तसेच ही खर्चिक बाब असल्याने सर्वसामान्य रुग्णांना उपचार घेणे त्यांच्या अवाक्यात नसल्याने अनेक रुग्णांना हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. म्ह्णून सुपर स्पेशालिटी रुग्णालयात कँसर उपचारासाठी स्वतंत्र युनिट सुरु करण्यासंदर्भात अमरावतीच्या आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. यासाठी आवश्यक वैद्यकीय संसाधने उपलब्ध करण्याला घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री ना. अजितदादा पवार यांच्याकडे भरीव निधीची मागणी करण्यात आली. त्याअनुषंगाने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे कर्करोग उपचारासाठी यंत्र सामग्री, तसेच इतर विभागांसाठी आवश्यक असणारी वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यास १३२.६४ कोटी एवढ्या रकमेस जुलै २०२३ मध्येच प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली होती . सदर बाबीकरिता निधी वितरित करण्याला घेऊन आमदार महोदयांनी वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला असता गेल्या डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशन २०२३ च्या पुरवणी मागणीत ६६.३२ कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला असून सुरुवातीला २० कोटी इतकी तरतूद करून निधी वितरित करण्यात आला आहे.

परंतु कर्करोगासाठी आवश्यक रेडिएशन सेफ्टी ऑफिसर , मेडिकल फिजिसिस्ट इत्यादी मनुष्यबळ व व अतिविशेषोपचार तज्ज्ञ उपलब्ध होत नाही. त्यामुळे कँसर युनिट मध्ये आरोग्य सुविधा सुरु करण्यास विलंब लागत असून अडचणी निर्माण झाल्या आहे. या बाबत सुद्धा आ.सौ.सुलभाताई खोडके यांनी उपमुख्यमंत्री महोदयांना अवगत केले असता या संदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाशी समन्वय राखून योग्य उपाययोजना करण्या संदर्भात आश्वासित करण्यात आले होते. यावर आता विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय नाशिक व अमरावती येथील कर्करोग उपचारासाठी यंत्र सामुग्री व वैद्यकीय उपकरणे खरेदीची बाब वगळून त्याऐवजी रेडिओथेरपी आणि डे -केअर किमोथेरपीची आरोग्य सुविधा खाजगी भागीदारी तत्वावर (पीपीपी ) सुरु करण्यास शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने १३० कोटी रकमेच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. या अंतर्गत अमरावती व नाशिक येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ) या ठिकाणी प्रतियुनिट ६५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.

ग्रामीण भागासह मेळघाटातील गरजू रुग्णांना मिळणार सुविधा – आ.सौ. सुलभाताई खोडके

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये चांगल्या दर्जाच्या आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध करण्याला घेऊन आपले सर्वोतोपरी प्राधान्य आहे . दरम्यान रुग्ण कल्याण नियामक मंडळाच्या बैठकीत सुद्धा कॅन्सर रुग्णांसाठी आवश्यक युनिट व वैद्यकीय संसाधनाबाबत मंथन करण्यात आले असता निधीला घेऊन शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता . आता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल साठी १३० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून नाशिक व अमरावती साठी प्रतियुनिट ६५ कोटींचा निधी मिळणार आहे. अमरावती येथे कँसर रुग्णांसाठी रेडिओथेरपी आणि डे -केअर किमोथेरपीची सुविधा उपलब्ध झाल्याने आता मुंबई -पुणे व नागपूर कडे जाणाऱ्या रुग्णांची होणारी पायपीट थांबणार असून जिल्हातील ग्रामीण भागासंह मेळघाट व धारणी मधील गरजूंना सुद्धा आरोग्य सुविधा मिळणार आहे. तसेच जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला अधिक बळकटी मिळणार असून रुग्णांना देखील नवीन संजीवनी मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *