“रडायचे नाही लढायचे”

✒️ क्षिप्रा मानकर

वन विभागाच्या परिक्षेला चार महिने उलटून गेले.. निकालाच्या प्रतिक्षेत असणारी स्वप्नाली मात्र निकालापुर्वीच जंगल, जंगली श्वापदं, निसर्ग, झाडे वेली, तीथले रहिवासी या सर्वांमधे रमून गेली. आई वारंवार म्हणत होती..आणखी दुसर्या पण परिक्षेकडे लक्ष दे जरा.काय ते जंगल घेऊन बसलीस.. ओह कम ऑन आई. जंगलाच्या वाघीण चा काय थाट असतो तुला काय माहिती? पण आईच ती, लेकरांचे बरे वाईट तिच्या पेक्षा आणखी कुणाला कसे कळणार? .

ए स्वप्ना ऐक ना, आधी तुझे बाबा गेले, मग दादा गेला ,मला तुला गमवायचे नाही गं. जंगली श्वापदं सोड मला ना हल्ली माणसांची पण भिती वाटते. सोड तो नाद. तुझी हुशारी इतरत्र कामी लाव. एवढ्यात मैत्रीणचा फोन आला..ओयीईईई जंगल की राणी.. मेल खोल तेरा. देख जंगल राह देख रहा है तेरी .मेल बघताच एकदम डॅशींग, सृदृढ शरीरयष्टी ,अन् कणखर बाणा असलेल्या स्वप्ना ने आईला कवेतच उचलले.. अन् म्हणाली, ए माझी आईबाळा. चल तुला जंगल दाखवते. आता तु व जंगल यांनाच सांभाळणार मी. करिअर तर आता जंगलातच फुलणार माझे.

सामानाची जुळवाजुळव झाली अन् दोघी मायलेकी स्वप्नालीच्या नव्या नोकरीच्या ठिकाणी स्थायिक झाल्या. शहरापासून दूर घनदाट अशा व्याघ्र प्रकल्पात तीची पहिली पोस्टींग झाली. जाॅईन होताच कामाचा धडाका सुरू. इकडे स्वप्नाली करिअर चे स्वप्न रंगवत निसर्ग फुलवत होती अन् तिकडे एक अती प्रामाणिक , हुजरेगिरी न करणारी स्त्री नकोच असा वरीष्ठ अधिकार्यांचा आपसातला सूर होता. पण ती घाबरली नाही ,डगमगली नाही , एकदा तर पुर्नवसानाच्या कामात आदीवासींनी तीला डांबूनच ठेवले. अॅट्राॅसिटीच्या धमक्या मिळू लागल्या.
अशातच एक अधिकारी मित्रासोबत स्वप्नाली विवाहबद्ध झाली. आई ,जंगल अन् तिचा नवरोबा हे तीचे विश्व..पुढे लागलेली आईपणाची गोड चाहूल. स्वप्नवत वाटावे असे स्वप्नालीचे जग. वरीष्ठ अधिकारींचा जाच असला तरी तीची लढण्याची जिद्द कौतुकास्पद होती. तरी नवरा म्हणायचा, तु स्वतःची मानसिक व शारीरिक काळजी घे.फार त्रास होत असेल तर दे सोडून सर्व.अखेर अतिरिक्त काम व जाच या कोंडीत स्वप्नालीने आपले बाळ गमावले. आता ती पार कोलमडून गेली. अशातच तीला रात्री बेरात्री जंगलात एकटीच ये म्हणणारे काही फोन यायचे.. हरवलेल्या आईपणात ती या असल्या फोनला देखील सडेतोड उत्तर द्यायची.

आईपण राहून गेल्याचे शल्य बोचत असल्याने स्वप्नाली आता एक जखमी वाघीणच झाली होती. आपण आदीवासींना, जंगली श्वापदांना सुरक्षेचे कुंपण घातले आहे ,पण आपल्या भोवती अधिकारी पणाचे कुंपण शेत खातो म्हणतोय..कसं वाचवू स्वतःला? आईला,नवरोबा ला कशी सांगू ही गोष्ट. वरिष्ठांच्या जाचापायी मी बाळ गमावले पण माझे स्त्रीत्व नाही गमावू शकत. काय करु कुठे न्याय मागू. आई मुळगावी निघाली होती.बसमधे होती. स्वप्ना ने फोन केला, आई मी हरली, काळजी घे स्वतःची मी बाबा व दादा कडे निघाली. आई ओरडली थांब बाळा असा टोकाचा निर्णय घेऊ नको मी परत येते , सोड ती नोकरी तुला खूप संधी मिळतील. स्वप्नाली म्हणाली नाही आई, मी वनसेवेत म्हणजेच देशसेवेत दाखल झाली आहे.कर्तव्य असे मधेच सोडायचे नसते हे तुच शिकवले ना.

आई देशाला माझा “जय हिंद” कळव अन् इतर लेकिंना सांग इथे दलदल आहे. सांभाळून पाऊल ठेवा.अन् बंदूकीच्या चार गोळींचा एकच आवाज झाला. जंगलातील चालती बोलती वाघीण धारातिर्थी कोसळली होती.अन् क्षणात सर्व संपले. स्वप्नालीने जाता जाता पुरावे तेव्हढे लिहून ठेवले.पण उपयोग काय, अशी लेडी सिंघम पुन्हा मिळणार होती का जंगल ला?

समाजमाध्यमातून एकच आवाज गुंजायला लागला “जस्टीस फाॅर स्वप्नाली. ” आरोपीला अटक झाली,पुढे जामीनावर तो कदाचित निर्दोष सुटेलही. पण शासकीय सेवेत येणार्या पुढच्या अनेक स्वप्नालीचे काय? विषय इथेच संपत नाही. शासनाची विशाखा समिती कागदोपत्री उरली, प्रचार प्रसिद्धी पलीकडे महिला सुरक्षा विषय उरला नाही. कुठे जावं काय करावं, न्याय मागायचा तरी कुणाकडे . समाजातील अनेक लेकीबाळी रस्त्यावर उतरल्या स्वप्नाली साठी लावलेल्या मेणबत्तीच्या उजेडात स्वतःसाठी आशेचा एक किरण शोधू लागल्या. निवेदनाच्या कागदांची रद्दी झाली तर आपलेही करिअर असेच केराच्या टोपलीत जमा होणार का? या विचाराने उद्विग्न झाल्या.

असे घाबरून चालणार नाही सख्यांनो. मुळात संघर्ष हा स्त्रीचा स्थायीभाव असतो हे विसरू नका. संकटाशी दोन हात करायला तुम्ही शिकले पाहिजे, कुणी मसिहा धावून येत नसतो, तुमचा आधार तुम्हीच बनले पाहीजे, काळोखाचे ढग क्षणिक असतात ते फार काळ टिकत नाही. लगेच आकाश निरभ्र होतं. त्या आकाशाला गवसणी घालायला शिका, मनातले बोलायला शिका. शेअर व्हायला शिका? आत्महत्या हा शेवटचा पर्याय नसतो. तर जगण्यालाच अनेक पैलु पाडायला शिकलं पाहीजे. जेव्हढे पैलू जास्त रत्न तेवढंच चमकदार.

संकटांना ठणकाऊन सांगा , छळून घ्या संकटांनो संधी पुन्हा मिळणार नाही, मागून वार खुशाल करा पण मी गाफील असणार नाही. एकीचे आईपण राहून गेले, तीचे स्वप्न राहून गेलं.चला पुढे अनेक स्वप्नाली उध्वस्त होण्याआधी ही व्यवस्था बदलवूया, आपलं नवं जग उभारूया. आता रडायचे नाही तर लढायचे आहे आपल्याला हे लक्षात असू द्या.

लेखिका
  • ✒️क्षिप्रा मानकर

(प्रस्तुत लेखिका, सुप्रसिद्ध व्याख्यात्या, निवेदिका, समुपदेशक तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश प्रसिद्धीप्रमुख आहेत)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *