विशेष लेख : पुरुष समजून घेताना…

  • क्षिप्रा मानकर

रोज रोज वर्तमानपत्रात स्त्री अत्याचाराच्या बातम्या वाचून ती आधीच चिडली होती. तेवढ्यात मित्राचा फोन आला. ‘गुड मॉर्निंग’. ही आधीच वैतागलेली. ‘कसलं रे गुड मॉर्निंग? स्त्री म्हणजे निव्वळ उपभोगाची वस्तू राहिली आहे तुमच्यासाठी. नाहीतर शोभेची बाहुली. वाटलं तेव्हा वापरायची, नाचवायची, खेळवायची. आम्हाला स्वतःचं जग नाहीच का रे?’
मित्र पलीकडून बोलला, ‘ओ कलमवालीबाई, मी काय केले आता? माझ्यावर आज मोर्चा आहे वाटतं.’ ती रागात म्हणाली, ‘तुम्ही सर्व पुरुष सारखेच रे.’ ‘गप्प गं. तुझ्या वाईट अनुभवांचा ठपका सर्व पुरुषांवर का लावतेस? प्रामाणिकपणे सांग, तुला खरंच आमचा त्रास झाला का? आम्ही तुला कधी जपले नाही का? प्रोत्साहन दिले नाही का?’ ती निरुत्तर झाली. भूतकाळात डोकावली. एका त्रासदायक पुरुषासाठी आपण आपला तराजू एककल्ली करतोय, आपण चुकतोय याची जाणीव झाली. ‘सॉरी दोस्ता, उगाच तुझ्यावर ओरडले. खरंच तुम्ही सर्वच वाईट नाही रे…’
सामाजिक परिस्थिती याहून वेगळी नाही. जेव्हा स्त्रियांवर अत्याचार होतो, तेव्हा सर्वच पुरुषांना आरोपीच्या चष्म्यातून पाहिले जाते. आपल्याला मानसिक, शारीरिक, भावनिक पातळीवर जशी पुरुषांची गरज लागते. त्याहून अधिक त्यांना आपल्या सोबतीची गरज असते. आपण सहज मनातले बोलून मोकळे होतो. त्यांना जरा वेळ लागतो. आपण चार-दोन आसवे सहज ओघळू देतो. बरेचदा हक्काचा खांदाही शोधतो. त्याचे रडणे म्हणजे कमजोरी दाखवणे. आपल्याला हंबरडा फोडता येतो. त्याने नुसता उसासा जरी टाकला तरी हसे होते.
तो कितीतरी भूमिकांत कायम जबाबदारी उचलत राहतो. कधी स्वतः फाटका राहून लेकरांची हौस भागवतो. बहिणीची खोडी काढताना इतरांनी तिची छेड काढू नये म्हणून ढाल होतो, ती दुखावेल या भीतीने प्रेम त्यागून निखळ मैत्री जपतो, तिची अखंड बडबड ऐकत तास न् तास समुद्र किनारी तिच्या डोळ्यांत स्वतःला शोधणारा प्रियकर होतो, सप्तपदीची सात वचने आयुष्यभर निभावणारा नवरा होतो, तर कधी फायलींच्या गर्दीत हरवलेली ती बघून, मॅडम पावणेसहा झालेत तुम्ही निघा घरी आम्ही बघून घेऊ म्हणणारे कार्यालयीन सहकारी. हे सर्व पुरुष आपण आयुष्यात अनुभवत असतो. मग एकाच्या वाईटपणाची शिक्षा एवढ्या सर्वांच्या चांगूलपणाला आपण खरेच देऊ शकू का?
कलम ४९८चा बरेचदा काही स्त्रिया गैरफायदा घेतात. तेव्हा कित्येक पुरुष आत्महत्या करतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचापायी घेतात डोक्यात गोळी घालून. पुरुषांवर एखाद्या वरिष्ठ अधिकारी महिलेने अन्याय केला तर त्यांच्यासाठी असाच आवाज उठवला जाणार का? की ‘मर्द को दर्द नही होता’ असे समजायचे आपण? आपण स्त्री आहोत म्हणून आपल्याला समजून घ्यावे असे वाटत असताना, आपणही पुरुषांना समजून घेणे गरजेचे नाही का? ती नदी होऊन मनातला सारा कोलाहल दऱ्या, पर्वत, पठाराला सांगून मोकळी होणारी. तो समुद्रासारखा अथांग दिसणारा, पण आतल्या कोलाहलाचा ठावही लागू न देणारा; कायम उपेक्षित.

काही पुरुष असतीलही जंगली श्वापदांसारखे कायम आक्रमक, विकृत मानसिकतेचे. त्याची चाहूल लागताच आपण सावध होणे आवश्यक आहे. निसर्गाने पुरुषांना पाच इंद्रिये दिली तरी आपल्याला मात्र सहावे इंद्रिय दिले आहे. पुरुषांची नजर, स्पर्श आपल्याला लगेच कळतो. ज्या हाती करंगळी सोपवतो, तो किती सुरक्षित आहे हे डोळस होऊन तपासायची जबाबदारी आपली असते.
तो कधी अमर्याद प्रेम करतो, तर कधी लाथाडतो. भांडून एकटे सोडून जातो, तर कधी तिच्यासाठी साऱ्या जगाशी भांडण घेतो. अलवार कपाळी ओठ टेकवतो, तर कधी बेभान होऊन कुशीत शिरतो आणि कधी तर चक्क पाठ फिरवून घोरत झोपी जातो. फणसासारखा काटेरी भासला तरी त्याच्याही आत प्रेमाचे गरे असतातच ना. आपण वाळू होऊन निसटून जाऊ एकदाचे. तो मात्र विरहाच्या जखमा आयुष्यभर कुरवाळत बसतो. इतका हळवा असतो तो आतून.
आपल्या बाईपणाचे लाड पुरवताना एक लक्षात ठेऊ या, प्रत्येक पुरुष हा साहिर नसला तरी इमरोझ होण्याचा आयुष्यभर प्रयत्न करतो. स्त्रीलाही पुरुष समजून घेण्यासाठी अमृता होता आले पाहिजे. शेवटी समाजरथ स्त्री-पुरुष या दोन चाकांवरतीच तर धावतो ना?

या ‘उजेडाचे गाव’ या सदरातून विविध ज्वलंत विषय मांडता आले. लेखांतून महिलाविषयक प्रश्न मांडले. अनेकांना हे लेख आपले वाटले. हा लेखन प्रवास खूप छान होता. काॅलम लिहण्याची संधी दिली.अनेकांना ते लेख आपले वाटले. वाचकांचे आणि ‘मटा’चे मनस्वी आभार.

क्षिप्रा मानकर

(प्रस्तुत लेखिका सुप्रसिद्ध व्याख्यात्या, निवेदिका, समुपदेशक तथा जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश प्रसिद्धीप्रमुख आहेत.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *