अमरावती विभागात कोरोनाचे तीन हजार बळी

अकोला, 
कोरोना रुग्णांची व या आजाराने मृत्यू होणार्‍यांची संख्या वाढती आहे. त्यावर अद्याप पूर्णतः नियंत्रण आले नाही. अमरावती विभागात जवळपास तीन हजार रुग्णांचा कोरोनाने बळी गेला आहे. सरकारी यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार ही आकडेवारी समोर आली आहे.मात्र, ही संख्या यापेक्षा अधिक असल्याचा दावा या विषयातील जाणकार करीत आहेत. विभागात सर्वाधिक फटका हा यवतमाळ जिल्ह्याला बसला. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये 2,941 जण कोरोनाने दगावले आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रात दाखल झालेल्या कोरोनाने गेल्या तेरा महिन्यांच्या काळात राज्यात 44 लाख 73 हजार 248 जणांना बाधित केले. त्यापैकी 67,096 जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यामध्ये विदर्भातील अकरा जिल्ह्यांमधील 10,073 जणांचा समावेश आहे.

अमरावती विभागातील यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक 903 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. त्यानंतर अमरावती जिल्ह्यात 862, अकोला जिल्ह्यात 609 जणांचे बळी गेले असून, वाशीम जिल्ह्यात 266 आणि बुलडाणा जिल्ह्यात 361 जण कोरोनाने मृत्यूमुखी पडले आहेत. उच्च रक्तदाब, मधुमेह, ह्रदयविकार, कर्करोग असे दुर्धर आजार असलेल्या विभागातील पाच जिल्ह्यांमधील 18 जणांचा समावेश असल्याची नोंद आरोग्य विभागाने केली आहे.अमरावती विभागातील 2 लाख 14 हजार 333 जण कोरोनाच्या विळख्यात सापडल्याची नोंद आरोग्य विभागाने शासनाला पाठविलेल्या अहवालात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *