रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणाची सखोल चौकशी करा. आ. सुलभाताई खोडके यांची सीपी डॉ. आरती सिंह यांच्याशी चर्चा

रेमडेसिवीर साठेबाजीचा पर्दाफाश केल्या बद्दल शहर पोलिसांचे केले अभिनंदन

अमरावती १३ एप्रिल : कोरोना उपचारासाठी वापरात असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शन चा काळाबाजार करणे हि अत्यंत गंभीर बाब असून रुग्णाच्या जीविताशी खेळणाऱ्या या लज्जास्पद प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात मोठे रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन यामागचे अदृश्य चेहरे समोर आणण्याची गरज असल्याची बाब आ.सौ.सुलभाताई खोडके यांनी अमरावती पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्याशी चर्चा करतांना स्पष्ट केली.
कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी वापरले जाणारे रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा व नागरिकांची होणारी आर्थिक फसवणूकीच्या तक्रारीमुळे कुठे तरी रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची साशंका निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर अमरावती शहर पोलिसांनी सापळा रचून रेमडेसिवीर इंजेक्शनच्या साठेबाजीचा पर्दाफाश केला. या कारवाईत दोन सरकारी डॉक्टरांसह अटेन्डन्स, परिचारिका व लॅब सहायक अशा सहा जणांना अटक करण्यात आली आहे. कोरोना उपचारामध्ये अत्यावश्यक असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार उघडकीय आणल्याबद्धल आ. सुलभाताई खोडके यांनी अमरावती शहर पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह व त्यांच्या नेतृत्वातील गुन्हे शाखा व विशेष पथकाचे अभिनंदन केले आहे. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापरात येणारे रेमडेसिवीर या इंजेक्शनची केंद्रीय व्यवस्था संपुष्टात आल्यानंतर ते इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाने कोविड रुग्णालयांवर टाकलेली आहे. याचाच गैर फायदा घेत रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे जाणवत आहे. असे देखील आ. सुलभाताई खोडके यांनी चर्चेदरम्यान सांगितले. त्यामुळे कोरोना संक्रमित रुग्णांच्या जीविताशी खेळणाऱ्या या गंभीर प्रकरणाची कसून व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, तसेच या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन या मागचे मास्टर माईन्ड शोधून काढून त्यांचे चेहरे उघड करण्याची गरज असल्याचे सुद्धा आमदार महोदयांनी सीपी डॉ. आरती सिंह यांच्याशी चर्चा करतांना सांगितले. यावेळी सीपी डॉ. आरती सिंह यांनी रेमडेसीवीर इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरण व पोलीस कारवाई संदर्भात आ. सुलभाताई खोडके यांना सविस्तर माहिती दिली. सद्या लॉकडाउन मुळे अमरावती पोलीस संचारबंदीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी एखाद्या योध्याप्रमाणे अहोरात्र सेवा देत आहे. अशातच अमरावती शहर पोलिसांनी तत्परता दाखवून रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणाचा पर्दाफाश केला. याबाबत आपल्याला शहर पोलिसांचा अभिमान असल्याचे गौरवोद्गार सुद्धा आ. सुलभाताई खोडके यांनी यावेळी व्यक्त केले. पोलीस आयुक्तालयात झालेल्या या भेटीप्रसंगी यश खोडके उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *