आर्णीचा दर्शन दुगड यूपीएससीत विदर्भात दुसरा, तर देशात 138 वा

आर्णी
केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून त्यामध्ये आर्णी येथील दर्शन प्रकाशचंद दुगड या युवकाने आपल्या दुसर्‍या प्रयत्नात यश संपादन करीत कठीण समजल्या जाणार्‍या या परीक्षेत विदर्भातून दुसरा, तर देशातून 138 वा येऊन यश संपादन केले.
 
येथील प्रकाश दुगड हे आर्णी पंचायत समितीच्या आसरा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. त्यांना मुलगा दर्शन व मुलगी चेतना अशी अपत्ये आहेत. दर्शन लहानपणापासूनच हुशार असून त्याचे शालेय शिक्षण आर्णीलाच झाले. दहावीत 92 टक्के आणि बारावीत 88 टक्के गुण मिळवत दर्शनने अमरावतीच्या शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्थापत्य शाखेत पदवी मिळवली.
 
त्यानंतर दर्शनने मुंबई व हैद्राबाद येथे नोकरी केली. पण त्याला काहीतरी वेगळं करायचं होतं. त्याने नोकरी सोडून दिल्लीला जाऊन यूपीएससीची तयारी सुरू केली. पहिल्या प्रयत्नात यश मिळाले नाही आणि आणखी जिद्दीने तो अभ्यासाला लागला. त्याने दुसर्‍या वेळेस परीक्षा दिली त्याचा निकाल 24 सप्टेंबरला लागला. त्यात तो देशभरातील 761 विद्यार्थ्यांमधून 138 वा आणि विदर्भातून दुसरा आला.
 
दर्शन दुगडच्या या नेत्रदीपक यशाची माहिती मिळताच आर्णी येथे त्याच्या घरी आई वडिलांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक शुभचिंतक पोहचले. दर्शनने ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले की मला काहीतरी करून दाखवायचे आहे. मला अपेक्षित स्थान न मिळाल्याने मी ही परीक्षा पुन्हा देणार आहे. मला शिक्षण क्षेत्रात कार्य करायचे असून त्यात येणार्‍या अडचणींना सहज सोप्या करायच्या आहे, असेही तो म्हणाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *