गडचिरोलीत ४२ वर्षीय इसमाची हत्या

गडचिरोलीः २६ वर्षीय युवकाने एका ४२ वर्षीय इसमाची हत्या केल्याची घटना आज २८ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. इंद्रजित गोविंद नमो (४२) रा.खुदीरामपल्ली, ता- मुलचेरा, जिल्हा गडचिरोली असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार २७ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास खुदीरामपल्ली येथील मुख्य चौकात किशोर चक्रवर्ती यांच्या दुकानात मृतक इंद्रजित गोविंद नमो आणि हत्या करणारा युवक अभिजित प्रसंजीत माली या दोघांमध्ये वाद झाला. दोघांचा वाद विकोपाला जाऊन अभिजित माली या २६ वर्षीय युवकाने इंद्रजित नमो यांच्यावर चाकूने हल्ला केला.यात इंद्रजित नमो याच्या गालावर (कानाखाली) जबर मार लागल्याने रक्तबंबाळ अवस्थेत त्याला मुलचेरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

हत्या करणारा आणि मृतक इसम हे दोघेजण एकाच ठेकेदारकडे पेंटिंगचे व पीओपीचे काम करत होते. काही दिवसांपूर्वी मृतक इंद्रजित गोविंद नमो याला कामावरून काढण्यात आल्याने या दोघांमध्ये वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यापूर्वी सुद्धा या दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती मृतकाचे भाऊ सूर्यकांत नमो यांनी मटाशी बोलताना दिली आहे. नेमकं वाद कशामुळे झाला हे पोलिसांच्या चौकशीअंतीच कळणार असलेतरी या हत्येमुळे मुलचेरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *