बहिणाबाईंचं जगणंच कविता झाली

वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी ती विधवा झाली. जळगावातल्या प्लेगच्या साथीनं ओंकारला कायमचं अपंगत्व आलं. एकत्र कुटुंबापासून पुढे तुटली. ओंकार, सोपान आणि काशी या तीन लेकरांसह ती नव्यानं उभी राहिली. तिचा लढा सुरू झाला. ती तीन लेकरांना आणि स्वतःला जगवण्यासाठी शेतमजुरी आणि अन्य कामं करू लागली. वेदना खदखदतच होती. अचानक आलेल्या इतक्या दुःखांचा भार ती सोसत होती. तिची ही वेदना, हे दुःख काम करता करता शब्दरूप व्हायला लागलं. तिची वेदना बोेलकी झाली. ती वेदना, जगण्यातले अनुभव असं बरंच काही कवितेतून फुलायला लागलं. तिचं जगणंही ही कविता झाली. ही महान कवयित्री आहे, बहिणाबाई चौधरी. त्यांचा 3 डिसेंबर हा स्मृतिदिन.

जळगाव (खानदेश)जवळील आसोदा गावात बहिणाबाईंचा नागपंचमीला 11 ऑगस्ट 1880ला जन्म झाला. भीमाई आणि उखाजी महाजन हे त्यांचे आई-वडील. वयाच्या 13 व्या वर्षीच त्यांचं नथ्थुजी खंडेराव चौधरी यांच्यासोबत लग्न झालं. लहान वयातच त्यांचं लग्न झालं. त्यासोबतच त्यांची जबाबदारी वाढली. अनुभवात हळूहळू भर पडायला लागली. यात लहानपणापासून त्यांचं निरीक्षण सूक्ष्म होतं. आयुष्यभर त्यांनी केलेलं निरीक्षण आणि अनुभव त्यांच्या कवितेतून उतरलं. ते जिवंत असल्यामुळे आजही वाचकांच्या काळजाला भिडतात.

बहिणाबाई चौधरी यांना शालेय शिक्षण मिळालं नाही. तरी त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा खूप व्यापक होत्या. त्यांनी काढलेले तर्क, त्यांची कल्पनाशक्ती, त्यांच्या कवितेतील उपमा, रूपक हे थक्क करून सोडणारे आहेत. शेतीमातीशी त्यांचा रोजचाच संबंध. शेतातली अथवा घरातली रोजची कामे, सण, उत्सव, व्यवहार वगैरे त्यांच्या कवितेतून येतात. नियमित भेटणारे ज्योतिषी, बहुरूपी आणि अन्य लोककलावंत, त्या उपमा अलंकार अगदी अद्भूतच आहेत. वारकरी धर्म, भक्तीतल्या नामस्मरणाचं महत्त्व सांगताना त्या सहज म्हणतात,

बिना कपाशीनं उले, त्याले बोंड म्हणू नही

हरी नामाईना बोले त्याले तोंड म्हणू नही

संत सावता महाराजांच्या अभंगांत शेती आणि भक्तीचे अनेक दाखले आहेत. बहिणाबाईंच्या कवितांतून, गाण्यातून आपल्याला ते अनेकदा दिसतात. बहिणाबाई अत्यंत विज्ञानवादी होत्या. त्यांनी अत्यंत संघर्ष केला होता. स्वतःचं अस्तित्त्व निर्माण केलं. तीन लेकरांना घडवलं. त्यामुळे त्या प्रत्यक्ष कृतीवर भर देत. त्या ज्योतिष्यावर विस्वास ठेवत नव्हत्या. दारात आलेल्या ज्योतिष्याला त्या ठाम उत्तर देतात,

नको नको जोतिषा..
नको हात माझा पाहू
माझं दैव माले कये..
माझ्या दारी नको येऊ

बहिणाबाईंच्या कवितेतली शेती, माणसं, पक्षी, निसर्ग हे काल्पनिक नाहीत. ’याची देही याची डोळा’ जे त्यांनी अनुभवलं, तेच त्यांनी शब्दांतून मांडलं. त्यामुळे अगदी सर्वसामान्यांपासून तर ज्ञानी, विद्वानांपर्यंत सर्वांनाच त्यांची कविता थेट जाऊन भिडते. शेतात काम करताना जे अनुभवलं, पाहिलं ते बरंच काही त्यांच्या कवितेतून सहज ओसंडतं. शेतीची साधने, देव अजब गारोडी, हिरीताचं देनं घेनं, कापनी या कवितांतून त्यांचे शेतीतले अनुभव बहरतात.

बहिणाबाईंच्या कवितेतून देव भेटतो. सण, उत्सवांचं सेलिब्रेशन्स येतात. आई, सून, लेक, बहीण अशा विविध नात्यांची गंुफणही येते. संपर्कात आलेल्या काही व्यक्तिविशेषांचंही चित्रण होतं. वेदनांही येतात. या सर्वांमध्ये बहिणाबाई नेहमीच पॉजिटिव्ह आहेत.

बहिणाबाईंच्या कविता त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरी आणि सोपानदेवांचे मावसभाऊ पीतांबर चौधरी यांनी लिहून काढल्यात. त्या कविता एक दिवस त्यांनी आचार्य अत्रेंना दाखवल्या. त्या वाचता वाचता आचार्य अत्रे अवाक झालेत. त्यांनी या कवितांना प्रस्तावना लिहून बहिणबाईंचा पहिला कवितासंग्रह जगासमोर आणला. पहिल्यांदाच त्या कविता वाचताना अत्रे यांच्या मुखातून अगदी सहज निघालेत, ‘हे तर बावनकशी सोनं’. खरं या सोन्यानं मराठी कवितेला एक वेगळी झळाळी दिली. बहिणाबाई चौधरी या मातीशी जुळलेल्या कवियित्रीचं 3 डिसेंबर 1951 रोजी निधन झालं. त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.

  • सुनील इंदुवामन ठाकरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *