मोठी बातमी! ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासूनच राज्यात कठोर निर्बंध लागू होणार; नववर्षाच्या स्वागत कार्यक्रमांवर विरजण!

गेल्या काही दिवसांपासून राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. गुरुवारच्या आकडेवारीनुसार राज्यात करोनाचे ५ हजार ३६८ नवे बाधित सापडले आहेत. त्यामध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या तब्बल १९८ इतकी आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील संभाव्य रुग्णवाढ टाळण्यासाठी कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ३१ डिसेंबर अर्थात शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच राज्यात हे निर्बंध लागू केले जाणार आहेत. त्यामुळे नव्या वर्षाच्या स्वागत कार्यक्रमांवर विरजण पडलं असून या निर्बंधांमुळे जाहीर कार्यक्रमांवर बंदी घालण्यात येणार आहेत.

गुरुवारी दिवसभरात आधी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि नंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वाढत्या करोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लागू करण्याचे सूतोवाच दिले होते. निर्बंधांबाबत मुख्यमंत्री आज किंवा उद्या निर्णय घेणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं होतं. यादरम्यान आता शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच हे निर्बंध लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली असून त्याबाबतचा शासन आदेश राज्य सरकारने काढला आहे.

काय असतील निर्बंध?
करोना काळात सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी ही सर्वात धोकादायक बाब ठरली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या जाहीर कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यासोबतच, अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींची संख्या ५० इतकी मर्यादित केली जाणार आहे. तसेच, अंत्यसंस्कारांसाठी देखील फक्त २० व्यक्तींनाच परवानगी देण्यात आली आहे.

दोन दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट!
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये करोनाच्या आकडेवारीविषयी माहिती दिली. “राज्यात आज ५ हजार ३६८ पॉझिटिव्ह रूग्ण आढळलेले आहेत. काल ३ हजार ९०० होते. मुंबईत काल साधारण २२०० च्या दरम्यान रुग्ण होते. आज चार हजाराच्या दरम्यान आढळले आहेत. जवळजवळ एक दिवसाआड म्हणजे दोन दिवसात दुप्पट संख्या होत आहे. मुंबईचा आजचा दिवसभरातला पॉझिटिव्हिटी रेट ८.४८ टक्के आहे, ठाण्याचा देखील आजचा पॉझिटिव्हीटी रेट ५.२५ टक्के आहे. रायगडचा ४ टक्के आहे. पालघरचा ३ टक्के आहे आणि पुण्याचा ४.१४ टक्के आहे. याचा अर्थ असा आहे की साधारण १०० तपासण्या केल्या तर त्यामध्ये अशा प्रमाणात पॉझिटिव्ह रूग्ण आढळत आहेत.”, अशा शब्दांत राजेश टोपे यांनी चिंता व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *