जिजाऊ – सावित्री दशरात्रोत्सव ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’

स्त्री शिक्षणाची कवाडे खुली करून महिलांना शैक्षणिक प्रकाशझोतात आणण्याचे ऐतिहासिक कार्य करणाऱ्या सावित्रीबाईंचा इतिहास जाज्वल्य आहे. आद्य भारतीय शिक्षिका, मुख्याध्यापिका, शिक्षणतज्ज्ञ, वयाच्या १७व्या वर्षी १८४८ साली भिडेवाड्यात पहिली शाळा सुरू करणाऱ्या स्त्री शिक्षणाच्या जनक म्हणजे सावित्रीबाई ज्योतिबा फुले.

‘स्त्री’मुक्तीच्या आद्य प्रणेत्या, आद्य मराठी कवयित्री, काव्यफुले(१८५४) व इतर पुस्तके प्रकाशित झालेल्या साहित्यिक. बालहत्या प्रतिबंधक गृह व अनाथ बालकाश्रमाच्या संचालिका, सत्यशोधक समाजाच्या नेत्या. अशी सावित्रीमाईंची चतुरस्र ओळख आहे.

पुण्या-मुंबईत प्लेगने कहर मांडला होता. शेकडो माणसे दररोज मरत होती. त्यांच्या मृत्यूंची नोंद करायला नगरपालिकेजवळ कारकून नव्हता. ३६७ लोक मृत्यूमुखी पडले असताना, केवळ २८९ मृतांचीच नोंद नगरपालिकेच्या दप्तरात केल्या जात होती. ब्राह्मण विधवेकडून दत्तक घेतलेला सावित्रीमाईंचा मुलगा यशवंत हा डॉक्टर होता. सावित्रीमाईंनी त्याला तार करून पुण्यात बोलावून घेतले. हडपसरजवळ ससाणे मळ्यात तंबू टाकून दवाखाना सुरू करायला लावला. तो आईला या आजाराची भीषणता समजावून सांगत होता.

सावित्रीमाईंचा एक प्रश्न होता, ‘आज ज्योतीराव असते तर ते निष्क्रिय बसून राहिले असते काय?’ आपल्याला जमेल तेवढ्या रुग्णांना आपण वाचवू या..

त्याकाळी ॲम्बुलन्स होती, ना स्ट्रेचर. आजार भयानक होता. संसर्गजन्य होता. आजारी माणसाला स्पर्श केला तर माणूस मरतो हे डोळ्यासमोर दिसत असल्याने पुणे शहरावर भितीचे सावट होते. कुणीही कुणाच्या मदतीला येत नव्हते. अंधश्रद्धेमुळे लोक औषधपाणी करायला, घरात फवारणी करून घ्यायला घाबरत होते. पुण्यात प्लेग कमिश्नर म्हणून रँड साहेब आरोग्याची सक्ती करीत असल्याने नाराजी वाढत होती. सावित्रीमाई एकटीने घरोघरी फिरून आजारी असलेली मुले, मुली, महिला यांना उपचारासाठी डॉ.यशवंतच्या दवाखान्यात घेऊन जात होत्या. स्वतः त्यांची सुश्रुषा करीत होत्या. इतक्यात मुंबईत कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांचा प्लेगने आजारी असलेल्या कामगारांवर उपचार करताना मृत्यू झाल्याची बातमी आली. सावित्रीमाईंना शोक अनावर आला.

पुणे शहरातले बहुतेक सगळे पुढारी जीवाच्या भितीने गावोगावी पांगले होते. सावित्रीमाईंनी कित्येकांना वाचवले. बरे केले. मुंढव्याच्या दलित वस्तीतल्या गायकवाडांच्या मुलाला प्लेग झाल्याचं सावित्रीमाईंना समजलं. गायकवाड अस्पृश्य मानले जात असल्यामुळे शासकीय वैद्यकीय कर्मचारीही मदत करत नव्हते. सावित्रीमाई तिथे धावून गेल्या. पांडुरंग गायकवाड ११ वर्षांचा होता. काखेत गोळा आलेला. तापाने फणफणलेला. एका चादरीत पोराला गुंडाळलं. पाठीवर घेतलं.

सावित्रीमाईंचे वय झालेले होते. गेली ५० वर्षे त्या अहोरात्र राबत होत्या. ७ वर्षांपूर्वीच ज्योतीराव गेले होते. मुंढवा ते हडपसरचा ससाणे मळा, व्हाया मगरपट्टा पल्ला मोठा होता. ६७ वर्षे वयाची एक म्हातारी बाई अकरा वर्षांच्या आजारी पोराला पाठीवर घेऊन सात-आठ किमी. चालत जाते. त्याच्यावर उपचार करते. त्याला बरा करते. पांडुरंग जगतो. मोठा होतो. सावित्रीमाई त्याला पाठीवर घेऊन चालल्या असतील तेव्हा त्या नक्की प्लेगला सांगत असणार, ‘मेरा पांडुरंग नहीं दूँगी’. मृत्यूला त्यांच्यापुढे पराभव पत्करावा लागला. पण त्याच काळात, त्याच कामात सावित्रीमाईंना मात्र प्लेगचा संसर्ग झाला. पांडुरंग हा त्यांनी वाचवलेला शेवटचा रुग्ण.

सलग ५० वर्षे आपला देह या समाजासाठी, महिला, मुलं, मुली यांच्यासाठी वाहिलेला होता. आता देह थकला होता. १० मार्च १८९७ रोजी सावित्रीमाई प्लेगमध्ये रुग्णसेवेचे काम करता करता गेल्या. असंख्य अडचणींवर मात करून स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांचा जन्मदिवस ३ जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो. तसेच त्यांचा जन्मदिवस महिला शिक्षणदिन म्हणूनही साजरा करण्यात येतो. ३ ते १२ जानेवारी या काळात, हा ‘दशरात्रोत्सव’ साजरा करताना सावित्रीमाईंच्या ज्ञानप्रकाशात कायम आमचे आयुष्य उजळून निघो, अन् घराघरांत सावित्री जन्माला येवो, हीच सदिच्छा…

क्षिप्रा मानकर, प्रदेश प्रसिद्धीप्रमुख, जिजाऊ ब्रिगेड, महाराष्ट्र मो. : 78750 56593

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *