भंडारा : धावत्या रेल्वेतून पडून माय – लेकाचा दुर्देवी मृत्यू

भंडारा : नागपूरहून रेवा येथे जाण्यासाठी रात्रीच्या रेल्वेने जात असलेल्या माय-लेकाचा धावत्या रेल्वेतून पडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. देव्हाडा – माडगी वैनगंगा नदी पुलावर घडली ही घटना घडली आहे. पूजा इशांत रामटेके ( वय 27) व अथर्व इशांत रामटेके (वय 18 महिने) रा. टेकानाका (नागपूर) असे मृत माय-लेकाचे नाव आहे.

मध्यप्रदेशातील रिवा येथील सैनिकी शाळेत रसायनशास्त्राचे प्राध्यापक असलेले इशांत रामटेके रा. टेकानाका नागपूर हे सुटी संपल्याने कुटुंबासह नागपूर रेल्वेस्थानकाहून रेवा येथे जाण्यासाठी रात्रीच्या रेल्वेने निघाला होता. तुमसर रेल्वे स्थानकावरून गाडी पुढे जात असताना पत्नीला लघुशंका लागल्याने पतीला सांगून ती दिड वर्षाच्या मुलासह रेल्वे डब्यातील प्रसाधनगृहाकडे गेली.

त्यावेळी मुलगा धावत-धावत समोर गेला आणि काही कळण्याच्या आतच माडगी व देव्हाडा दरम्यान वैनगंगा नदी रेल्वे पुलावरुन नदीत पडला. आपल्या मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात महिलेचा तोल जावून ती सुद्धा रेल्वे पुलावर कोसळली आहे.

या घटनेमध्ये दिड वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर महिलेला पुलाचा मार लागून लटकलेल्या स्थितीत मरण पावली आहे. ही घटना रात्रीच्या दरम्यान घडल्याची प्राथामिक माहिती पोलीसांनी दिली आहे. बराचवेळा झाल्यानंतरही पत्नी व मुलगा परत न आल्याने पतीने धावत्या रेल्वेत शोधाशोध केली. परंतू शोध न लागल्याने त्याने गोंदिया येथे पत्नी व मुलगा हरविल्याची तक्रार नोंदविली. मात्र आज सोमवारी रेल्वे कर्मचारी पेट्रोलिंगवर असतांना त्यांना एका महिलेचा मृतदेह लटकलेल्या स्थितीत तर मुलाचा मृतदेह नदीत आढळून आला. घटनेची माहिती रेल्वे पोलीस व करडी पोलिसांना होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. इशांत रामटेके यांनी दोन्ही मृतदेहाची ओळख पटविल्यानंतर शव उत्तरीय तपासणीसाठी तुमसर येथे पाठविण्यात आले. तसेच घटनेचा पुढील तपास करडी पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *