गोंदिया । विहिरीत बिबट्यासह तीन रानडुक्कर मृतावस्थेत आढळून आले

गोंदिया – जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटना समोर येत आहेत. त्यातच आता तिरोडा वनपरिक्षेत्रातील किडंगीपार जवळी एका शेत शिवाऱ्यात असलेल्या विहिरीत बिबट्यासह तीन रानडुकरे मृतावस्थेत आढळून आले आहेत. वनविभागाने त्या वन्यप्राण्यांचे मृतदेह विहिरीतून काढत शवविच्छेदन करुन त्यांचा अंतविधी केला आहे.

सविस्तर माहिती अशी की, किडंगीपार येथील रहिवासी हरिचंद दादूजी तुरकर यांच्या शेतात असलेल्या विहिरीत एक बिबट्या व तीन रानडुक्कर मृतावस्थेत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार वन परिक्षेत्र अधिकारी एस. के. एकरे, क्षेत्र सहाय्यक एस. जी. पारधी, बीट गार्ड महेंद्र सूर्यवंशी व वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. घटनेची माहिती वनसंरक्षक व सहायक वनसंरक्षक यांनाही देण्यात आली आहे. त्यानंतर मृत बिबट्या व तीन डुकरांना बाहेर काढण्यात आले.ही घटना पाहता बिबट्याने डुकरांची शिकार करण्यासाठी त्यांचा पाठलाग केला. यावेळी तीन रानडुकरांसह बिबट्या विहिरीत पडला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. तसेच, पुढील वैज्ञानिक परीक्षणासाठी सदर मृत बिबट्या अवयवाचे नमुने जतन करून ताब्यात घेण्यात आले आहे. सर्व कार्यवाही पुर्ण झाल्यानंतर मृत बिबट्या व दोन रानडुक्कर यांना दहन करून व एका रानडुक्करास खोल खड्यात पुरून विल्हेवाट लावण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *