इगतपुरीत गँगवारचा भडका, दोन गटात तुफान हाणामारी, एकाचा मृत्यू

नाशिक : नाशिक जिल्ह्यात गुन्हेगारी प्रचंड फोफावताना दिसत आहे. विशेष म्हणजे इगतपुरी तालुक्यात तर गुन्हेगारीने परिसिमाच गाठली. इगतपुरीत भर दिवसा गँगवारचा भडका उडाला. इगतपुरीत पूर्ववैमनस्यातून दोन गटात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत एकाचा खून तर एक जण गंभीर जखमी झालं. जखमीला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पण या घटनेमुळे इगतपुरीत खळबळ उडाली आहे.

संबंधित घटनेमुळे इगतपुरीते नागरिक हे दहशतीखाली आहेत. घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या घटनेमुळे गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच बाजारपेठ बंद करण्यात आली आहे. या घटनेप्रकरणी अद्याप कुणाला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आलेली नाही. पोलिसांचा या प्रकरणी तपास सुरु आहे.

विशेष म्हणजे एवढा मोठा गदारोळ होतो तोपर्यंत पोलीस कुठे असतात, पोलिसांना याबाबत कोनोकान खबरही लागत नाही? याशिवाय आरोपींना पोलिसांची अजिबात भीती वाटत नाही का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. संबंधित घटनेमुळे इगतपुरीच्या नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. भरदिवसा अशाप्रकारच्या घटना तरी कशा घडू शकतात? असा प्रश्न त्यांना सतावतोय. आरोपी इतक्या भयानक पद्धतीने एकमेकांना भिडतात त्यावेळी कुणी सर्वसामान्य तिथे आजूबाजूला असला तर त्याचाही जीव घ्यायला ते गुंड मागेपुढे बघणार नाहीत, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. व्यापाऱ्यांना कोरोना संकट काळात आर्थिक संकटासह अनेक संकटांना समोरं जावं लागलं. त्यात आता आणखी या गुंडांच्या हैदोसाने त्यांच्यावर दुकानं बंद ठेवण्याची नामुष्की आली आहे. त्यामुळे त्यांच्यावरही मनस्तापाची वेळ आली आहे. पोलीस आतातरी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सुरळीत करतील का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. पोलीस आरोपींना पकडतात का याकडे इगतपुरीच्या नागरिकांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *