कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर कलावंतांना एकरकमी अर्थसाह्य

जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत 36 अर्ज मंजूर

अमरावती, दि. 28 : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सांस्कृतिक व कलाक्षेत्रातील संघटित व असंघटित कलाप्रकारांतील विविध कलावंतांना एकरकमी अर्थसाह्य करण्यात येत आहे. योजनेचे निकष पूर्ण करणा-या 36 कलावंतांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. उर्वरित अर्जांचाही संवेदनशीलपणे विचार करावा व अधिकाधिक कलावंतांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे दिले.

योजनेत प्राप्त अर्जांनुसार पात्र कलावंतांची निवड करण्यासाठी बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, समितीचे सदस्य सचिव अति. मु. का. अधिकारी एस. एम. कुलकर्णी, जिल्हा सूचना अधिकारी अरूण रणवीर, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, जिल्हा समाजकल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर, महापालिकेचे डॉ. विशाल काळे, सदस्य दिलीप काळबांडे,राजेंद्र भुडेकार, हरीनारायण ढोले, दिलीप व-हाडे, भोलेश्वर मुदगल, देवीदास गायकवाड, प्रमिलाताई गणवीर, नारायण दरेकर, अजय महल्ले आदी यावेळी उपस्थित होते.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात टाळेबंदी लागू होती. त्यामुळे सुमारे दीड वर्षे कलावंतांना कला सादरीकरण व त्यातून मिळणा-या उत्पन्नापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे संघटित व असंघटित क्षेत्रातील प्रयोगात्मक प्रकारातील कलाकारांना शासनातर्फे प्रतिकलावंत 5 हजार रूपये एकरकमी अर्थसाह्य देण्यात येत आहे.

जिल्ह्यातून 14 तालुक्यांतून 197 अर्ज प्राप्त झाले. योजनेचा लाभ मिळण्यासाठी विहित अर्ज, महाराष्ट्रात 15 वर्षांचा अधिवास, 15 वर्षे कला क्षेत्रात कार्यरत असणे, उत्पन्नाचा दाखला, वृद्ध कलावंत योजनेचा लाभ घेतलेला नसणे आदी निकष ठरविण्यात आले आहेत. त्यानुसार प्राप्त अर्जांपैकी 36 अर्जदारांची निवड करण्यात आली, अशी माहिती सदस्य सचिव श्री. जाधवर यांनी दिली. कलावंतांचे कोविडकाळात मोठे नुकसान झाले. त्यामुळे प्राप्त अर्जांचा संवेदनशीलपणे विचार करावा. अधिकाधिक कलावंतांना योजनेचा लाभ द्यावा, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *