आसाराम बापूच्या आश्रमात खळबळ; कारमध्ये सापडला मुलीचा मृतदेह, चार दिवसांपासून होती बेपत्ता

गोंडाः उत्तर प्रदेशमधील गोंडा येथे असलेल्या आसाराम बापूचे आश्रम पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. आसाराम बापूच्या आश्रमात एका कारमध्ये मुलीचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

स्वाती पांड्ये असं मृत तरुणीचं नाव आहे. ४ दिवसांपूर्वी स्वाती घरातून बेपत्ता झाली होती. त्यानंतर तिचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ३ वर्षांपूर्वी माझे पती मनोज पांडे बेपत्ता झाले होते. त्यांचा अजून पत्ता लागलेला नाही. ४ दिवसांपूर्वी माझी मुलगीही बेपत्ता झाली आणि आज तिचा मृतदेहच सापडला. दोन वर्षांपूर्वी स्वातीचा अपघात झाला होता. त्यानंतर तिचं मानसिक संतुलन बिघडलं होतं. ४ दिवसांपूर्वी संध्याकाळी सातच्या सुमारास तिचं अपहरण करण्यात आलं. आम्ही स्वातीला खूप शोधलं मात्र तिचा ठावठिकाणा लागला नाही. आज सकाळीच आश्रमात खूप दिवसांपासून उभी असलेल्या ऑल्टो कारमध्ये तिचा मृतदेह सापडला, अशी माहिती स्वातीची आई गीता पांडे यांनी दिली आहे.

पोलिसांनी कार व आश्रम सील केले

घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी कारबरोबरच पूर्ण आश्रमही सील केला असून घटनेचा पुढील तपास करत आहेत. तरुणीची हत्या करुन मृतदेह गायब करण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. कारमधून घाण दुर्गंधी येत असताना आश्रमच्या सुरक्षारक्षकाने कार उघडून पाहिली असता कारमध्ये त्याला मृतदेह सापडला. याबाबतची माहिती त्यांने तातडीने पोलिसांना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *