भंडाऱ्यात कुलरने घेतला तरुणीचा जीव; घरातील फरशी साफ करताना जागीच मृत्यू

भंडारा 17 जून : मृत्यू कधी कुठे कसा आणि कोणत्या रुपात येईल, हे कोणीही सांगू शकत नाही. अनेकदा घरातच आपली रोजची कामं करत असतानाही अशा काही घटना घडतात, ज्या जीवावर बेततात. घरात असलेल्या इलेक्ट्रिक वस्तूच अनेकदा यात मृत्यूचं कारण ठरतात. सध्या अशीच एक घटना भंडाऱ्यातून समोर आली आहे. या घटनेत फरशी साफ करत असताना कुलरचा धक्का बसल्याने एका तरुणीचा मृत्यू झाला आहे

ही घटना भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील पाहुणगाव येथील आहे. सुचिता धनपाल चौधरी असं घटनेत मृत पावलेल्या तरुणीचं नाव असून तिचं वय अवघं 22 वर्षे होतं. सकाळी ती आपल्या घरात साफसफाईचं काम करत असताना ही घटना घडली. घरात लावलेल्या कुलरजवळची जागा साफ करत असताना तिचा कुलरला स्पर्श झाला. परंतु, या कुलरमध्ये वीज प्रवाहित असल्याने विजेचा जबर धक्का लागून ती खाली कोसळली आणि बेशुद्ध पडली.

सुचिता कोसळल्याचं कळताच घरात एकच गोंधळ उडाला. यानंतर लगेचच तिला उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केलं. या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. लाखांदूर पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. सध्या पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *