वाशीम‎ जिल्ह्यात २७ गावांचा संपर्क तुटला‎, संततधारमुळे नदी – नाल्यांना पूर

वाशीम‎ । जिल्ह्यात साेमवारी रात्रीपासून संततधार‎ पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील‎ जनजीवन विस्कळीत झाले आहे.‎ शेतीची कामे ठप्प झाली आहे.‎ जिल्ह्यातील अनेक नदी-नाल्यांना पूर‎ आला आहे. या पुरामुळे जिल्ह्यातील‎ २७ रस्ते बंद झाल्याने या गावांचा संपर्क‎ तुटला आहे. यामध्ये वाशीम‎ तालुक्यातील राजगाव येथील नाल्याला‎ पूर आल्याने राजगाव ते अनसिंग रस्ता,‎ अटकळी येथील नाल्याला पूर आल्याने‎ अटकळी ते येवती रस्ता बंद आहे.‎ तोंडगाव येथील चंद्रभागा नदीला पूर‎ आल्याने वाहतूक बंद आहे. चंद्रभागा‎ नदीला पूर आल्याने वाशीम ते बोरखेडी‎ रस्ता, अडाण नदीला पूर आल्याने पार्डी‎ टकमोर ते जनुना, सोनवड, पार्डी‎ टकमोर ते वारा जहागीर रस्ता बंद आहे.‎ बिटोडाजवळील शेत शिवारात‎ नाल्याला पूर आल्याने पार्डी टकमोर‎ रस्ता, पूस नदीला पूर आल्याने‎ वाराजहाँगीर ते अनसिंग रस्ता बंद आहे,‎ काजळंबा शिवारातील नाल्याला पूर‎ आल्याने येथील कमी उंचीच्या‎ पुलावरून पाणी वाहत असल्याने‎ तात्पुरता संपर्क तुटला आहे. खरोडा‎ गावाजवळील नाल्याला पूर आल्याने‎ कमी उंचीच्या पुलामुळे तात्पुरता संपर्क‎ तुटला आहे.‎ रिसोड तालुक्यातील खडकी (खंगारे)‎ शिवारात अढळ नदीला पूर आल्याने‎ मालेगाव तालुक्यातील रिठद ते‎ शिरसाळा, शिरसाळा ते खडकी ढंगारे या‎ रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत‎ असल्याने या गावांचा तात्पुरता संपर्क‎ तुटला आहे. रिठद गावाजवळील अढळ‎ नदीला पूर आल्याने रिठद‎ बसस्थानकावरून गावात जाणाऱ्या‎ रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत‎ असल्याने गावाचा संपर्क तुटला आहे.‎ मालेगाव तालुक्यातील अमनवाडी,‎ मुसळवाडी, कुत्तरडोह, माळेगाव व‎ धरमवाडी या गावाचा संपर्क काटेपूर्णा‎ नदीला आलेल्या पुलामुळे तुटला आहे.‎ पांगरी (नवघरे) गावाजवळील नाल्याला‎ आलेल्या पुरामुळे गावाचा संपर्क तुटला‎ आहे. मंगरूळपीर तालुक्यातील‎ पिंपरीजवळून वाहणाऱ्या अडाण नदीला‎ आलेल्या पुरामुळे पिंप्री ते खरबी रस्ता,‎ आसेगाव जवळील भोपळपेंड नदीला‎ आलेल्या पुरामुळे आसेगाव ते‎ मंगरूळपीर रस्ता, मोझरीजवळील‎ नाल्याला आलेल्या पुरामुळे मोझरी ते‎ पिंप्री (बु.), शिवणीजवळील शिवणी‎ नाल्याला आलेल्या पुरामुळे शिवणी ते‎ बसस्थानक रस्ता, वरुड (बु.)‎ गावाजवळील नाल्याला आलेल्या‎ पुरामुळे, मंगळसा गावाजवळील‎ नाल्याला आलेल्या पुरामुळे मंगळसा ते‎ बेलखेड रस्ता आणि मानोलीजवळून‎ वाहणाऱ्या अडाण नदीला आलेल्या‎ पुरामुळे अरक ते निंबी रस्ता बंद आहे.‎ यातील ज्या गावांचा संपर्क तात्पुरता‎ तुटला आहे त्यातील काही गावांना पर्यायी‎ मार्गसुद्धा दुसऱ्या गावाला जाण्यासाठी‎ उपलब्ध आहे.‎ नागरिकांनी नदी-नाल्यांना पूर‎ आल्यास नदी-नाल्यांच्या काठावर पूर‎ पाहण्यासाठी जाऊ नये. नदी-नाल्यांना‎ पूर असताना पुरातून रस्ता‎ ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. दुचाकी‎ किंवा चारचाकी वाहनेसुद्धा पुराच्या‎ पाण्यातून काढण्याचे धाडस करू नये.‎ पूर ओसरल्यानंतरच रस्ता वाहतुकीसाठी‎ खुला असल्याची खात्री करूनच रस्ता‎ अथवा पुलावरून वाहने काढावीत, असे‎ आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने‎ करण्यात आले आहे.‎

वाशीम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पूर येत आहे. एकबुर्जी धरणातून विसर्ग सुरू असल्यामुळे तोंडगाव ते वाशीम रोडवरील नाल्याला पूर‎ आला. तसेच मंगरूळपीर तालुक्यातील खरबी-पिंप्री येथे अडाण् नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.‎

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *