अमरावती । ‘चित्रांगदा’ ची लोकांकिका स्पर्धेच्या विभागीय अंतिम फेरीत धडक

शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीची हृदयस्पर्शी एकांकिका “चित्रांगदा” ची निवड लोकसत्ता आयोजित प्रतिष्ठित “लोकांकिका करंडक” च्या विभागीय अंतिम फेरीसाठी झाली असून दिनांक ८ डिसेंबर रोजी नागपूर येथील लक्ष्मी नगर स्थित सायंटिफिक सभागृहात या एकांकिकेचा विभागीय अंतिम प्रयोग सादर होणार आहे. सुप्रसिद्ध सिनेकलावंत हास्यजत्रा फेम समीर चौगुले यांच्या उपस्थितीत ही स्पर्धा संपन्न होणार आहे.

महाभारतातल्या अनेक महत्त्वपूर्ण पात्रांपैकी विस्मृतीत गेलेल्या चित्रांगदा या माणिपूरच्या राणीचे चरित्र रेखाटणारी ही मूळ हिंदी एकांकिका अमरावतीचे सुप्रसिद्ध नाट्यकर्मी श्री विशाल तराळ यांनी लिहिली असून त्यांच्या मार्गदर्शनात या एकांकिकेचे सादरीकरण करण्यात आले. या एकांकिकेचा मराठी अनुवाद प्रा डॉ मनीष गायकवाड यांनी केला असून दिग्दर्शन महाविद्यालयाची विद्यार्थीनी कु आकांक्षा तीखिले हिने केले आहे. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी सौरभ अधाऊ आणि रुचिता खेडकर यांचे महत्वपूर्ण योगदान या एकांकिकेच्या घडणावळीत आहे.

पुरातन काळातील चित्रांगदेच्या कथेप्रमाणेच आधुनिक युगात देखील महिलांचे होणारे शोषण आणि तिची अगतिकता प्रभावीपणे मांडण्याचे काम या एकांकिकेच्या माध्यमातून श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले आहे.

उत्कृष्ट लिखाण, प्रभावी अभिनय आणि सांघिक सादरीकरण या तीनही पातळ्यांवर उच्च गुणवत्ता साधणाऱ्या या एकांकिकेचा प्राथमिक फेरीतील प्रयोग दिनांक ३ डिसेंबर रोजी नागपूर येथील विनोबा भावे सभागृहात पार पडला. चित्रांगदेची मध्यवर्ती भूमिका कु. हुमांशी गभणे या विद्यार्थिनीने निभावली तर इतर भूमिका वेदांत उमरे, आकांक्षा तिखिले, आदित्य ताजनेकर, राधिका टोपरे, सायली इंगळे, गौरी पवार, निखिल डोंगरदिवे, प्रियांशु गावंडे, साक्षी मोडक यांनी उत्कृष्टपणे वठविल्या. सर्वेश चांदूरकर, आचल चव्हाण यांनी प्रकाशयोजना सांभाळली तर संगीत कु प्रणाली पवार हिने दिले. कलाकारांच्या रंगभूषेचे काम कु श्रुती गावंडे, साक्षी बोरकर, ईश्वरी मोहोड यांनी केले.

उपस्थित कलारसिकांसोबतच परिक्षकांची मने जिंकून या एकांकिकेने विभागीय अंतिम फेरीत धडक मारली आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी व्ही कोरपे तसेच सांस्कृतिक समिती सदस्य प्रा डॉ दिनेश खेडकर, प्रा डॉ रुपाली टोणे, प्रा डॉ मनीष गायकवाड, प्रा डॉ हर्षाली वानखडे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांच्या अथक प्रयत्नातून लाभलेल्या या यशासाठी संपूर्ण चमुचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *