चंद्रपूर – शेतीच्या मोबदल्यासाठी महाराष्ट्र-तेलंगणा राज्य महामार्गाचे काम शेतकऱ्यांनी पाडले बंद

महाराष्ट्र – तेलंगणा राज्य महामार्गाचे बांधकाम सुरू आहे. मात्र, या महामार्गासाठी अधिग्रहीत करण्यात आलेल्या शेतजमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी महामार्गाचे काम बंद पाडले. त्वरित मोबदला न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

मागील महिनाभरापासून सकमुर-वेदगावदरम्यानचे काम बंद आहे. सन १९७२ पूर्वी धाबा-पोडसा या मार्गाच्या कामाला सुरुवात झाली. मार्गालगत असलेल्या शेतजमिनी मार्गात गेल्या. जमिनीचा मोबदला देऊ असं प्रशासनानं सांगितलं. मात्र पन्नास वर्ष उलटले तरी मोबदल्याच्या नावावर शेतकऱ्यांचे हात रिकामेच आहे. जमिनीचा मोबदल्यासाठी शेतकऱ्यांनी शासकीय कार्यालयात चकरा मारल्या. आमदार, खासदार मंत्र्यांना निवेदने दिलीत. मात्र, फाईलवर साचलेली साधी धूळही उडालेली नाही. आता नव्याने धाबा-पोडसा या मार्गाचे काम सुरू झाले आहे.

आधी जमिनीचा मोबदला द्या, मगच कामाला सुरुवात करा, अशी भूमिका घेत शेतकऱ्यांनी रस्त्याचे काम बंद पाडले. जोपर्यंत मोबदला मिळणार नाही, तोपर्यंत काम करू देणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. या आंदोलनात आदराव काळे, श्यामराव खर्डीवार, पोचन्ना खर्डीवार, राजन्ना जक्कुलवार, मल्लया मुत्तमवार, पुंडलिक काळे, विकास लिंगे, गजानन जकुलवर, आदाबाई पेरगुरावर, गुरुदास खर्डीवार, राजेश झाडे, वासुदेव वाकुडकर, मंगेश काळे, आदी सहभागी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *