दहावी परीक्षेच्या भीतीने ‘तो’ रेल्वेगाडीत बसला अन..

नागपूर : दहावी आणि बारावी परीक्षेत पाल्यांना अधिकाधिक गुण मिळावावे, असे पालकांना वाटते आणि त्याचे दपडपण पाल्यांवर असते. त्यातून अनेकदा मुलांना नैराश्य येते. परीक्षेच्या काळात ते तणावात असतात. काही जण तर टोकाचे पाऊल उचलतात. पण येथे विचित्र प्रकार घडला.

छत्तीगडच्या डोंगरगड येथील एका दहावीतील मुलाने घरातून पळ काढून रेल्वे स्थानक गाठले आणि मिळेल त्या गाडीत बसला. तो थेट नागपुरात पोहोचला. त्याचे आई-वडील व्यावसायिक आहेत. तो वर्गात नेहमीच अव्वल राहायचा. त्यामुळे तो दहावीतही अव्वल राहणार, अशी अपेक्षा पालकांकडून होती. मात्र, तो अभ्यासामुळे तणावात राहू लागला. परीक्षेच्या पहिल्या पेपरच्या दिवशीच तो घरून पळाला. बराच वेळ होऊनही तो घरी परतला नसल्याने चिंतित पालकांनी राजनांदगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.

मुलाकडे मोबाईल होता. त्यामुळे पोलिसांनी त्याचे लोकेशन मिळविले. तो नागपूर स्थानकावर असल्याचे लक्षात आले. लगेच तेथील पोलिसांनी नागपूर लोहमार्ग पोलिसांना सूचना दिली. लोहमार्ग पोलिसांना तो फलाट क्रमांक ३ वर आढळून आला. तो तणावात होता. त्याचे पोलिसांनी समुपदेशन केले. नंतर त्याच्या पालकांना सूचना देण्यात आली. समुपदेशानंतर तो घरी जायला तयार झाला. त्याला त्याच्या भावाच्या स्वाधीन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *