चंद्रपूर : पेपर देण्यासाठी जात असलेल्या विद्यार्थ्यांची मधमाशांनीच घेतली ‘परीक्षा’, हल्ल्यात तीन विद्यार्थी व शिक्षक जखमी

राजुरा तालुक्यातील संजय गांधी कनिष्ठ महाविद्यालय, पेलोरा या परीक्षा केंद्रावर (केंद्र क्रमांक ०२४७) प्रवेशद्वाराजवळ मधमाशांनी हल्ला चढवल्यामुळे तीन विद्यार्थी व शिक्षक जखमी झाले. ही घटना सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. त्यामुळे परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाला. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी कडोली प्राथमिक आरोग्य केंद्रावर पाठवण्यात आले आहे.

उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे पेपर सुरू आहेत. बुधवार १ मार्च रोजी बारावीचा रसायनशास्त्र व व्होकेशनल विषयाचा पेपर होता. सकाळी ११ ते २ या वेळात पेपर असल्याने विद्यार्थी परीक्षा केंद्रावर प्रवेश करत असताना प्रवेशद्वाराजवळच मधमाशांनी हल्ला चढवला. त्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला. यात मधमाशांनी चावा घेतल्यामुळे तीन विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाली. यात सूरज भिमनकर व तेजस मुके हे गंभीर जखमी झाल्यामुळे उपचारासाठी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले. यात मोरेश्वर लांडे (शिक्षक) व दीपक उमरे हा विद्यार्थीही मधमाशांच्या हल्ल्यात सापडले. लगेच परिस्थिती आटोक्यात आणण्यात आली. उपचारासाठी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र कडोली येथे फोन करून रुग्णवाहिका बोलवण्यात आली. यानंतर पेपरला नियमित वेळात सुरुवात करण्यात आली. पेलोरा येथील परीक्षा केंद्रावर एकूण ९६ विद्यार्थी परीक्षा देत होते. परीक्षा केंद्रावर अर्धा तास अगोदर विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पेपर देण्यासाठी खोल्यांमध्ये जात असताना ही घटना घडली. त्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या नैसर्गिक घटनेत दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना परीक्षेला उपस्थित होता आले नाही. या घटनेची माहिती केंद्रप्रमुख यांनी ‘कस्टोडियन’ व ‘बोर्डा’ला कळवली असल्याची माहिती केंद्रप्रमुख रामटेके यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *