सरकारी हॉस्पिटलची अवस्था पाहून बसेल धक्का, रुग्णांचा जीव टांगणीवर

गरीब व सामान्य नागरिकांना वर्धा जिल्हा रुग्णालयाचा मोठा आधार आहे. मात्र सोयी सुविधा पुरेशा नसल्याने रूग्णांसह सेवा देणाऱ्या डॉक्टर व कर्माचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. सामान्य रुग्णालयाच्या परिसरातील काही इमारती बऱ्याच जुन्या असल्याने त्या रुग्णांसाठी वापरण्यास योग्य नाहीत. त्या इमारती तोडून नव्याने इमारती बांधने अत्यावश्यक आहे. प्रशासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावात मेडीकल स्टोअर ते जुने अतिदक्षता विभाग जवळपास 1780 चौ.मी. जागेत आहे. या इमारतीला 102 वर्षे झाले आहेत. त्यामुळे ही इमारत तोडून नवीन इमारती बांधकामासाठी अंदाज पत्रकानुसार 60 कोटी रुपयांची गरज आहे.
निधी अभावी काम रखडले

निवासी वैद्याधिकारी निवासस्थानाची इमारत सुध्दा त्याच दशकातील असून ती पूर्णतः नष्ट झाली आहे. ती तोडून बाह्यरुग्ण संकुल तयार करणे प्रस्तावित आहे. वर्धा येथे नव्याने स्थापित होत असलेल्या महिला रुग्णालयामध्ये महिला व बालरुग्णालय तयार करण्याचे प्रस्तावित होते. त्याकरीता दोन मजली इमारत बांधकामास मंजुरी देखील प्राप्त आहे. परंतु प्राप्त निधी अभावी दुसऱ्या मजल्याचे काम होऊ शकत नाही. त्यामुळे बालरोग आंतररुग्ण विभाग कार्यान्वित करण्यास अडचण निर्माण होत आहे. डायलेसीस विभागाचे विस्तारीकरण

दिवसेंदिवस डायलेसीस रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने डायलेसीस या विभागाचे विस्तारीकरण करणे आवश्यक आहे. प्रस्तावात तसे नमूद करण्यात आले आहे. प्रशासकिय कार्यालयास जागा कमी पडत असल्याने कार्यालयाचे विस्तारीकरणासाठी 90 लाखांचा निधी आवश्यक आहे. रुग्णालयातील काही इमारतींना तीन दशकांपेक्षा अधिक कालावधी झाल्याने छताचे वॉटर प्रुफींग करणे गरजेचे आहे. रुग्णालयातील पाण्याची पाईप लाईन, आऊटलेट पाईप लाईन बदलविणे आवश्यक आहे.
या सुविधा आवश्यक

नेत्र शस्त्रक्रियेकरिता रुग्णांना व परिचारिकांना ने आण करण्याकरिता 35 सीटर दोन बस, एक ब्लड बँक वाहन, स्तनकर्करोग निदानाकरीता मोनोग्राफी मशीन, शरीराचे आंतरभागाचे निदान करण्याकरीता एम.आर.आय मशिन, नेत्र शस्त्रक्रियेकरीता लॅसीक लेझर मशीन, विविध महत्वाचे शस्त्रक्रियेकरीता हाय ऍन्ड लॅप्रोस्कोपी मशीन, जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा व अधिनस्त उपजिल्हा / ग्रामीण रुग्णालय येथील अतिमहत्वाचे वर्ग -१ विशेष तंज्ञ, वैद्यकिय अधिकारी, तांत्रिक व प्रशासकिय पदे रिक्त असल्याने पदे भरणे आवश्यक असल्याचे आमदार डॉ. पंकज भोयर यांनी आरोग्यमंत्री सावंत यांना सांगितले. रूग्णालयाच्या सोयीसुविधा वाढविणे गरजेचे असल्याने प्रस्तावास तातडीने मान्यता दयावी, अशी मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *