वर्धा : उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ आता ‘स्वयंसेवीं’ची ‘महाभारत’ यात्रा

शिवसेना नेते उध्दव ठाकरे यांना आजी माजी नेत्यांनी घेरले. तेव्हा काही खास वगळता कोणीही त्यांच्या बाजूने जोरकस बाजू मांडत नसल्याचे चित्र राज्याने पाहले. पक्ष विरहित समाजकारण करणारे तर दूरच.या पार्श्वभूमीवर सदैव आंदोलनाच्या भूमिकेत राहणाऱ्या युवा परिवर्तन या स्वयंसेवी संघटनेने ठाकरे समर्थनार्थ यात्राच काढली आहे.

येथील ‘युवा परिवर्तन की आवाज’ या संघटनेने शिवाजी चौकातून यात्रेचा जागर केला. २२ मार्चला रामटेक येथील राम मंदीरातून यात्रा सुरू झाली असून ३० मार्चला मुंबईत मातोश्री येथे यात्रेचा समारोप होणार आहे. रामटेक, यवतमाळ, अमरावती ते मालेगाव, नाशिक, भिवंडी असा मार्ग राहणार असून मुंबईत यात्रा बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळापासून ते मातोश्री निवासस्थानापर्यंत पायदळ राहणार आहे.

संघटनेचे निहाल पांडे म्हणाले की यात्रेचे नाव महाभारत यात्रा आहे. महाभारतात ज्याप्रमाणे कौरवांनी धोका देत पांडवांचे राज्य हस्तगत केले होते त्याचप्रमाणे शिंदे-फडणवीस यांनी उध्दव ठाकरे यांना धोका दिला. केंद्राच्या सत्तेचा धाक दाखवत ठाकरेंना वनवास दाखविला. उध्दव ठाकरे हे एकनिष्ठ लोकांच्या ताकदीवर खंबीरपणे उभे आहे. एखाद्या व्यक्तीचे घर सरकारने पाडले तर सर्वसमाज त्या व्यक्तीच्या पाठीशी उभा राहतो. सरकार विरोधात आंदोलन करतो. लाखो शिवसैनिक शिवसेनेला आपले घर मानत होते. हे घर उध्दव ठाकरे यांना परत मिळवून देण्यासाठी ही यात्रा असल्याचे निहाल पांडे म्हणाले.

यावेळी शिंदे-फडणवीस यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली. यात्रेत मोठ्याप्रमाणात महिला व युवक सहभागी झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *