Buldhana – गहू साफ करण्याच्या मशीनमध्ये गळ्यातील रुमाल अडकला, फास बसून शेतकरी महिलेचा मृत्यू

बुलढाणा : आधुनिक यंत्र शेतकऱ्यांचा भार हलका करण्यासाठी उपलब्ध आहेत. मात्र गडबड गोंधळात एखादी हलगर्जी जीवघेणी ठरु शकते, याची उदाहरणं अनेक वेळा समोर आली आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे असाच काहीसा प्रकार घडला. एक छोटीशी चूक शेतकरी महिलेसाठी प्राणघातक ठरली. गळ्याला गुंडाळलेला रुमाल गहू साफ करण्याच्या फिल्टर मशीनमध्ये अडकल्याने विवाहितेला प्राण गमवावे लागले.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील शेतकरी तुळशीराम शेवाळे, त्यांच्या ३५ वर्षीय पत्नी शांताबाई, आणि त्यांचा मुलगा स्वतःच्या शेतामध्ये गहू स्वच्छ करण्याच्या फिल्टर मशीनवर काम करत होते. गहू स्वच्छ करीत असताना शांताबाई शेवाळे यांच्या गळ्याला गुंडाळलेला रुमाल अचानक मशीनमध्ये अडकला. यावेळी फिल्टर मशीनमध्ये अडकलेल्या रुमालाचा गळ्याला फास बसल्याने शेतकरी महिलेचा जागीच मृत्यू झाला


या घटनेमुळे संपूर्ण सिंदखेडराजा शहरावर शोककळा पसरली आहे. शांताबाई शेवाळे यांच्या पश्चात पती व दोन मुले असा परिवार आहे. या घटनेमुळे संपूर्ण गाव धक्क्यात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *