शेतकऱ्याची मुलगी वाशीम जिल्ह्यातील पहिली महिला अग्निवीर, ‘इंडियन नेव्ही’मध्ये निवड

वाशीम : सैनिक सेवेत महिलांचा टक्का कमी आहे. मुलींसाठी हे अवघड क्षेत्र समजले जाते. परंतु, याला फाटा देत आता मुलीदेखील सैनिक सेवेकडे वळू लागल्या आहेत.

तालुक्यातील काजळांबा येथील शेतकरी कुटुंबातील मनीषा राजकुमार उगले या २० वर्षीय तरुणीची पहिल्याच प्रयत्नात इंडियन नेव्हीमध्ये निवड झाली आहे. ती जिल्ह्यातील पहिली महिला अग्निविर ठरली असून, तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तालुक्यातील काजळांबा येथील मनीषा राजकुमार उगले ही लहानपणापासून अभ्यासात हुशार होती. तिचे वडील शेतकरी आहेत. मनीषाला इतर मुलींपेक्षा काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती. आपण मोठे होऊन देश सेवेत जाण्याचा तिने निर्णय घेतला आणि अथक परिश्रम घेतले. मुंबई येथे तिने अर्ज केला. परीक्षा पास झाली. मैदानी चाचणी परीक्षेत यश संपादन केले. सर्व पात्रता पूर्ण करून ४ महिने प्रशिक्षण पूर्ण केले. लवकरच ती तिच्या गावी येत आहे. वडील शेतकरी कुटुंबातील असूनही त्यांनी केवळ मनीषालाच नव्हे, तर मनीषाची मोठी बहीण आणि भावाला शिकविले.

मनीषा ही ग्रामीण भागातील तरुणी आज देश सेवा करणार आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने सैनिक सेवेत यश संपादन करून मुलीही कुठेच मागे नाहीत, हे सिद्ध करून दाखविले. हा प्रत्येक मुलीचा सन्मान असून, माय बापाच्या कष्टाचे मोल केले. तिचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *