यवतमाळ : पोलीस म्हणून बतावणी केली अन्…; युवकाला लुटणाऱ्या तिघांना अटक

यवतमाळ : राळेगाव तालुक्यातील करंजी येथे दोन तोतया पोलिसांनी साडेतीन हजार रुपयांनी तर पोहणा (ता. हिंगणघाट) मार्गावर स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी असल्याची बतावणी करून तिघांनी युवकाचे १५ हजार रुपये लुटल्याची घटना घडली. वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत धुमाकूळ घालणाऱ्या या तोतया पोलिसांच्या अखेर मुसक्या आवळण्यात आल्या. वडकी पोलिसांनी ही कारवाई वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट व वडनेर येथे केली.

महेंद्र उर्फ बाळू रमेश अंबुलकर (४३ रा. हिंगणघाट), दीपक पंढरी मेश्राम (४०, रा. करंजी सोनामाता) व अन्य एक अशी तोतया पोलिसांची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून चारचाकी वाहन व दोन दुचाकी असा एकूण सहा लाख तीन हजारांचा मुद्देमाल जप्त केला. करंजी येथील विकास विठ्ठल कोडापे (२५) हे जेवण करून बैलगाडीवर झोपून असताना दोन अज्ञात युवकांनी त्यांच्या जवळ येवून पोलीस असल्याचे सांगितले. तू जुगार खेळत होता.

आम्ही कारवाई करायला आलो, असे म्हणून खिशातील तीन हजार ५०० रुपये काढून पसार झाले. पोहणा-येवती मार्गावरील डोमाघाट मंदिराजवळही यवतमाळातील युवकास मारहाण करून १५ हजार हिसकावले. सुमेध लक्ष्मण लोखंडे (३३) रा. पिंपळगाव, यवतमाळ असे फिर्यादीचे नाव आहे. ते आजनसरा येथील कार्यक्रम आटोपून पोहणा-येवती मार्गे यवतमाळकडे येत होते. यावेळी होन्डा सिटी वाहनातील (क्र.एमएच २१, सीएन ३४०३) तीन व्यक्तींनी हातामध्ये प्लास्टिकची काठी घेवून फिर्यादीस अडविले. आपण स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी आहोत, अशी बतावणी करून वाहनाची तपासणी केली. तसेच काठीने मारहाण करून खिशातील १५ हजार रुपये जबरीने काढून पसार झाले.

दोन्ही घटनांची तक्रार वडकी पोलीस स्टेशनला देण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून वर्धा जिल्ह्यातून तिघांना ताब्यात घेतले. निर्मनुष्य रस्त्यांवर अशा घटना वाढल्याने पोलिसांनी आता दिवसाही पेट्रोलिंग वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *