नागपूर: अन् चक्क पांढरे घुबड झाले कॅमेरात कैद

नागपूर: लक्ष्मीचे वाहन म्हणून घुबड या पक्ष्याची ओळख असली तरीही रात्रीचा राजा म्हणून तो पक्षी अभ्यासकांना जास्त परिचित आहे. त्याच्याबद्दल जे काही समज-गैरसमज समाजात आहेत ते आहेतच, पण पक्षी अभ्यासक, छायाचित्रकार यात न पडता त्याची प्रतिमा कशी चांगली येईल, यादृष्टीनेच त्याला कॅमेऱ्यात कैद करतात. चंद्रपूर येथील वन्यजीव छायाचित्रकार मकरंद परदेशी अतिशय दुर्मिळ अशा पांढऱ्या घुबडाचे छायाचित्र श्री नाशिक पंचवटी पांजरापोळ येथे टिपले.

शरीरातील रंगद्रव्य कमी झाली की पांढरा रंग किंवा एखादा रंग कमीजास्त होतो. मग ते पक्षी किंवा प्राणी पांढऱ्या किंवा वेगळ्या रंगाचे दिसतात. पांढरे पक्षी किंवा प्राणी ही वेगळी प्रजाती नाही. शरीरातील रंगद्रव्यांच्या कमतरतेमुळे ते होते. या प्रकाराला ‘ल्युसिस्टिक अल्बिनिझम’ असे म्हणतात. बरेचदा या प्राणी आणि पक्ष्यांमध्ये ‘पार्शियल अल्बिनिझम’देखील आढळते.

शरीराचा काही भाग पांढरा (साधारणपणे डोक्याचा) तर काही भाग नैसर्गिक रंगांचा असतो. पेंच व्याघ्रप्रकल्पात काही वर्षांपूर्वी या प्रकारातील हरीण आढळले होते. तर बोर व्याघ्रप्रकल्पात फिकट तपकिरी रंगाचे ‘ल्यसिस्टीक अस्वल’ आढळले होते. मात्र, घुबड या पक्ष्यामध्ये हा प्रकार क्वचितच बघायला मिळतो. चंद्रपूर येथील वन्यजीव छायाचित्रकार मकरंद परदेशी यांना तो दिसलाच नाही तर हे छायाचित्र टिपण्यातदेखील त्यांना यश आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *