वचनाचा पक्का, हुकूमाचा एक्का, मुख्यमंत्रीपदासाठी अजितदादाच पक्का; नागपुरात झळकले बॅनर

नागपूर : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? यावर राजकीय पक्ष कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ लागली आहे. भावी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर नागपूरजवळील बुटीबोरीमध्ये काल पाहायला मिळाले. त्यानंतर आज नागपुरात एक बॅनर लावण्यात आले आहे. अजितदादा भावी मुख्यमंत्री होणार, असे या बॅनरवर लिहिले आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या धरमपेठ येथील निवासस्थानाजवळच हा बॅनर लावण्यात आला आहे. फडणवीसांच्या घराजवळच्या चौकात आणि त्यांच्या मतदारसंघात हा बॅनर लावला गेला आहे.

काही दिवसांपूर्वी अजित पवार हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असतील, अशी चर्चा होती. भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचा बॅनरही लावण्यात आला होता. दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील यांनी फडणवीस हे आमच्या मनातील मुख्यमंत्री आहेत, असे विधान केले होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. बुटीबोरीत फडणवीस यांना भावी मुख्यमंत्री घोषित करणारे बॅनर लावण्यात आल्याने संपूर्ण राज्यात पुन्हा चर्चा सुरू झाली.

आता राष्ट्रवादीचे नेते आणि जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी ‘अजित पवार भावी मुख्यमंत्री’ असे बॅनर नागपूर शहरात लावले आहे. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. २०२४ च्या निवडणुकीला बराच कालावधी आहे. पण त्यापूर्वीच ‘कौन बनेगा मुख्यमंत्री’ची स्पर्धा सध्या राज्यात सुरू झाल्याचे चित्र आहे.

नागपूरजवळील बुटीबोरी नगरपरिषदेचे अध्यक्ष बबलू गौतम यांनी देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर लावले. तर राष्ट्रवादीचे प्रशांत पवार यांनी अजित पवार यांचे बॅनर लावले आहे. हे खरे की नुसते पोस्टर वॉर होणार? अशी चर्चा नागपुरात सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीस विरूद्ध अजित पवार अशी पोस्टरबाजी करणे म्हणजे निव्वळ बालिशपणा आहे, असे काही लोकांचे मत आहे.

अजित पवार हेच भावी मुख्यमंत्री असा बॅनर लावण्यात आला आहे. पोस्टरवर ‘वचनाचा पक्का, हुकूमाचा एक्का, मुख्यमंत्रीपदासाठी अजितदादाच पक्का’ असे लिहिले आहे. पोस्टरवर प्रशांत पवार यांच्या छायाचित्रासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नेते प्रफुल्ल पटेल आणि अनिल देशमुख यांच्या छायाचित्रांचा समावेश आहे. विशेष म्हणजे अजितदादांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची राजकीय चर्चा रंगल्यानंतर हे बॅनर लावण्यात आले आहेत. याबाबत सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *