बुलढाणा: रात्रभर पाऊस; पाच बाजार समित्यांसाठी आज मतदान

बुलढाणा: जिल्ह्यात मुक्कामी आलेल्या अवकाळी पावसाने रात्रभर सर्वदूर हजेरी लावली. या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या उर्वरित पाच बाजार समित्यांसाठी मतदानास सुरुवात झाली आहे. २७ केंद्रावरील अधिकारी सज्ज असून पहिल्या तासात केंद्रावर तुरळक मतदार असल्याचे वृत्त आहे.

आज रविवारी चिखली, लोणार, शेगाव, नांदुरा आण जळगाव जामोद बाजार समित्यांसाठी २७ मतदान केंद्रावर मतदान होत आहे. संचालक पदाच्या ९० जागांसाठी अडीचपट म्हणजे २२५ उमेदवार आपले भाग्य आजमावत आहे. दुपारी चार वाजेपर्यंत चालणाऱ्या मतदानाच्या एका तासाने मतमोजणीस प्रारंभ होणार आहे.

पाचही ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप- शिंदे गट असाच सामना रंगला आहे. अनेक अपक्ष रिंगणात असून चिखली मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना व मनसे काही जागा लढवीत आहे. यामुळे होणाऱ्या मत विभाजनाचा कोणाला लाभ होणार हे निकालानंतर उलगडा होणार आहे.

दरम्यान एकूण मतदार संख्या ८२३२ असून चिखलीत सर्वाधिक २६१८ मतदार आहेत. याखालोखाल नांदुरा १७०५, लोणार १६७४, जळगाव १२४१ व शेगाव ९९४ अशी मतदारसंख्या आहे. पहिल्या टप्प्यातील पाच समित्यासाठी सरासरी ९५ टक्के मतदान झाले होते. पहिल्या दोन तासांत अल्प मतदान नंतर दुपारी १ वाजेपासून धुवांधार मतदान असा’ ट्रेंड’ राहिला. आजही याचीच पुनरावृत्ती होणार अशीच चिन्हे आहे. दुसरीकडे रात्री उशिरापर्यंत चालणारी मोजणी नेते व कार्यकर्त्यांच्या संतापाचे कारण ठरत आहे. इतर जिल्ह्यांचे निकाल रात्री ९ पर्यंत लागत असताना जिल्ह्यात मात्र त्यासाठी किमान मध्यरात्र लागत आहे. खामगावात शेवटचा निकाल उत्तररात्री ४ वाजता लागणे हे विदर्भातील ‘रेकॉर्ड’ ठरावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *