मुंबई : इगतपुरी येथे समृद्धी महामार्गावर पूल किंवा पुलाचा भाग कोसळलेला नाही, एमएसआरडीसीचे स्पष्टीकरण

मुंबई: मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाच्या कामादरम्यान दुर्घटनांची मालिका सुरुच आहे. गुरुवारी इगतपुरी येथे उभारण्यात येत असलेल्या पुलाच्या कामादरम्यान गर्डर (तुळई) कोसळल्याची घटना घडली. त्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कामादरम्यान सातत्याने होणाऱ्या दुर्घटनांमुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान इगतपुरी येथे कामादरम्यान पूल कोसळल्याचे म्हटले जात आहे. मात्र पूल किंवा पुलाचा कोणताही भाग कोसळला नसून पुलाच्या कामाअंतर्गत गर्डर बसविण्यात येत असताना गर्डर कोसळल्याचे स्पष्टीकरण महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) दिले आहे. पुलाच्या बांधकामासाठीचे गर्डर क्रेनने वरती चढवले जात असताना क्रेनला धक्का लागला. त्यामुळे गर्डर पडल्याचे एमएसआरडीसीने सांगितले.

समृद्धी महामार्ग सुरु झाल्यापासून अपघातामुळे वादात अडकला आहे. त्या कामादरम्यानही अपघात आणि दुर्घटना घडताना दिसतात. मागील वर्षी, एप्रिल २०२२ मध्ये नागपूर ते शेलू बाजारदरम्यान उन्नत मार्गाचा भाग कोसळला. एप्रिल२०२२ मध्येच सिंदखेड राजा येथे टप्पा ७ मध्ये साखळी क्रमांक ३३२+६६५ वरील व्हायडकच्या ठिकाणी क्रेनच्या साहाय्याने पुलावर गर्डर बसविण्यात येत होते. गर्डर उचलण्यात येत असताना गर्डर १० फूट उंच नेले असता क्रेनला लावण्यात आलेले जॅक घसरले आणि गर्डर जमिनीवर कोसळला. ऑगस्ट २०२२ मध्ये वाशीम येथील मालेगावदरम्यान वाहन मार्गासाठीच्या उन्नत मार्गिकेच्या कामासाठी उन्नत मार्गावर क्रेनच्या साहाय्याने गर्डर बसविण्यात येत असताना क्रेन चालकाकडून काही चूक झाली. त्यामुळे अचानक क्रेन कलंडली आणि गर्डर जमिनीवर कोसळले.

समृद्धी महामार्गाच्या कामादरम्यान सुरु असलेली दुर्घटनांची ही मालिका २०२३ वर्षातही सुरुच आहे. सोमवारी शिर्डी ते इगतपुरीदरम्यानच्या टप्प्यातील कामादरम्यान दुर्घटना घडली. घोटी ते सिन्नर दरम्यान गांगडवाडी पुलाचे काम सुरु असताना ही दुर्घटना घडली. या पुलाच्या कामासाठी गर्डर बसविण्यासाठी गर्डर क्रेनने वरती चढविण्यात येत असताना धक्का लागल्याने गर्डर कोसळल्याची माहिती एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली. कुठेही पूल वा पुलाचा भाग कोसळला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र समृद्धीच्या कामादरम्यान सातत्याने होणाऱ्या दुर्घटना आणि वाहतूक सेवेत दाखल करण्यात आलेल्या मार्गादरम्यान होणाऱ्या अपघातामुळे हा प्रकल्प वादात अडकताना दिसतो आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *