अकोला – अकोल्यात दोन गटांत राडा, पोलीस ठाण्याबाहेर दगडफेक, गाड्यांची जाळपोळ, १० जण जखमी, शहरात संचारबंदी लागू

अकोला शहरातील हरिहरपेठमध्ये मध्यरात्री दोन गटांमध्ये मोठी दंगल उसळली. या राड्यात अनेक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली आहे. दंगलखोरांनी अनेक दुचाकी, चारचाकी पेटवल्या तसेच अग्निशमन दलाच्या वाहनांची देखील तोडफोड केली आहे. या दंगलीत दोन्ही गटांमधील १० जण जखमी झाले आहेत. तसेच दोन पोलीसही जखमी झाले आहे. अकोला शहरातील अनेक भागांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. दंगलखोरांनी पोलीस ठाण्याबाहेरही दगडफेक केल्याचं सांगितलं जात आहे.

इन्स्टाग्रामवर एका व्यक्तीने वादग्रस्त पोस्ट शेअर केल्यामुळे आधी भांडण आणि मग दंगल उसळली असल्याचं सांगितलं जात आहे. या व्यक्तिविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अकोला शहरात मोठा पोलीसफाटा तैनात करण्यात आला आहे. आता परिस्थिती आटोक्यात असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

या दंगलीविषयी माहिती देताना अकोल्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, रात्री शहरात जातीय तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना शहराच्या काही भागात अचानक दगडफेक शुरू झाली. दंगलखोरांनी वाहनांचं नुकसान सुरू केलं, काही ठिकाणी जाळपोळ झाली. त्याचवेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रित आणण्याचा प्रयत्न केला.

संदीप घुगे म्हणाले, शहरात गरजेच्या ठिकाणी पुरेसा बंदोबस्त ठेवून गस्त घातली जात आहे. परिस्थिती नियंत्रित आणण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या सोडाव्या लागल्या. आम्ही नागरिकांना आवाहन करतो त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पोलिसांना सहकार्य करावं. तसेच कुठेही गर्दी करू नका. नागरिकांना यासंबंधीची कोणतीही महिती असेल तर त्यांनी ती माहिती पोलिसांना द्यावी आणि आम्हाला सहकार्य करावं.

दरम्यान, पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की, शहरातल्या संमीश्र वस्ती असलेल्या भागात कलम १४४ अंतर्गत संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये असं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *